मोठी बातमी : सर्वसामान्यांना झटका, पेट्रोल – डिझेल पुन्हा महागले
नवी दिल्ली,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या (कच्चे तेल) किमतीत होत असलेल्या प्रचंड चढ-उतारामुळे देशांतर्गत इंधन दरांचा भडका उडाला आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर ८७ पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर ९१ पैशांनी महागले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठवड्याभरापूर्वीच केंद्र सरकारने देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर लागोपाठ झालेली ही दुसरी दरवाढ आहे.
सामान्य जनतेसाठी हा दुहेरी झटका ठरला आहे; कारण, गेल्याच शुक्रवारी (१५ मे) तेल कंपन्यांनी दरांमध्ये प्रति लिटर जवळपास ३ रुपयांची मोठी वाढ केली होती. अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे.
विश्लेषक आणि उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या मते, ही दरवाढ जागतिक पातळीवर सुरू असलेल्या राजनैतिक आणि लष्करी संकटांचा थेट परिणाम आहे जागतिक तेल बाजारातील अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पार गेल्या आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक क्रूड पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम भारतावर होत आहे.

