भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

एरंडोलक्राईमजळगाव

ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी ताब्यात, दोन ट्रॅक्टर जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | ट्रॅक्टर चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी कारवाई करत एरंडोल परिसरात ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 25 हजार रुपये किमतीचे दोन चोरीचे ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.

एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 44/2026 व 84/2026 अंतर्गत ट्रॅक्टर चोरीचे सलग दोन गुन्हे दाखल झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून तातडीने तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विखरण (ता. एरंडोल) येथील विकी देवरे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या साथीदार गणेश भिकन गोसावी आणि प्रविण भाईदास कोळी (दोघे रा. विखरण, ता. एरंडोल) यांच्या मदतीने हे दोन्ही ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून दोन ट्रॅक्टर जप्त केले असून, फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली PSI जितेंद्र वल्टे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरिलाल पाटील, महेश पाटील तसेच पोलीस कर्मचारी राहुल कोळी, सागर पाटील, भूषण शेलार आणि चापोशी बाबासाहेब पाटील यांनी ही कारवाई यशस्वी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!