ब्रेकिंग : भुसावळ रेल्वे स्थानकावर तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा सापडल्याने खळबळ
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना दोन प्रवासी संशयित रित्या दिसल्याने पोलिसांनी संशयावरून दोन संशयितांना अडवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्या जवळ असलेल्या बॅगमधून पाचशे रुपयांच्या तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन आरोपींपैकी एक जण पोलिसांना चकवा देत फरार झाला असून दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरहून भुसावळला येणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी स्थानकावर अडवले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात नकली नोटांचे बंडल सापडले. पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये केवळ वरची नोट खरी असून उर्वरित सर्व नोटा बनावट असल्याचे आढळले.
रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, नकली नोटांचा हा साठा कुठून आणला आणि कुठे पाठवला जाणार होता, नकली नोटा तस्करांचे रॅकेट आहे काय? यांचा म्होरक्या कोण? याचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
दरम्यान जळगाव जिल्ह्यासह परिसरात नकली नोटा तस्करांचे रॅकेट असण्याची शक्यता असून जिल्ह्यात या पूर्वी अनेक ठिकाणी नकली नोटा सापडल्याचे समोर आले आहे. विशेषता: या नकली नोटा जुगार अड्ड्यावर चालविल्या जात असल्याचे ही समोर आले आहे. तपास यंत्रणांनी याची चौकशी करावी असा मुद्दा समोर येत आहे.