ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह भाजपच्या महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १८ एप्रिल २०२६ रोजी दिल्लीत निदर्शने करत असताना भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला आरक्षण विधेयकाच्या (घटनादुरुस्ती विधेयक) पराभवानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला होता. आंदोलना दरम्यान पोलिसांना रोखल्यानंतर, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. लोकसभेत विधेयक मंजूर न झाल्याने भाजप आक्रमक झाली असून, या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेत शुक्रवारी महिला आरक्षण विधेयक पडलं. त्यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप खासदारांनी आंदोलन करून विरोधकांवर टीका केली. त्यानंतर आज शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणे भाजपच्या महिला नेत्यांना भोवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आज शनिवारी खासदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार बन्सुरी स्वराज यांना ताब्यात घेतलं आहे.
राहुल गांधी यांच्या घराबाहेर आंदोलन
राहुल गांधी यांच्या घराबाहेर आंदोलन केल्याने पोलिसांनी केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्यासहित भाजप खासदार बन्सुरी स्वराज, खासदार कमलजीत सेहरावत यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेत असतानाही भाजप खासदार, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या जमल्या होत्या. परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलनावर नियंत्रण मिळवलं. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन होत असताना राहुल गांधी हे निवडणुकीसाठी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत.
लोकसभेत मोदी सरकारने शुक्रवारी तीन विधेयके पटलावर मांडली होती. यातील १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या विधेयकासाठी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मतदान पार पडलं. मोदी सरकारला हे विधेयक पास करण्यासाठी दोन तृतियांश मतांची गरज होती. परंतु विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली. तर या विधेयकाच्या विरोधात २३० मते पडली. त्यामुळे हे विधेयक संसदेत नामंजूर झालं. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर इतर दोन विधेयके सरकारने मागे घेतली. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली.
भाजपने काल विधेयकावरून राष्ट्रव्यापी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यानंतर भाजपच्या महिला नेत्यांनी आज शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. भाजपच्या महिला नेत्यांनी राहुल गांधी यांचा पुतळा रस्त्यावर जाळला. यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपच्या महिला कार्यकर्त्या काळे झेंडे घेऊन राहुल गांधी यांच्या घराबाहेर पोहोचल्या होत्या. या आंदोलनाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
