अल्पवयीन बालिकेला आमिष दाखवत घरात नेऊन गैरवर्तन ; ६५ वर्षीय वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | तालुक्यातील जोगलखेडा येथे साडेचार वर्षीय बालिकेला आमिष दाखवून घरात नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) समोर आली. या प्रकरणी धनराज दगडू जंजाळे (वय ६५, रा. जोगलखेडा) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अपहरण व विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित बालिका सकाळी सुमारे ११ वाजता घरासमोरील अंगणात खेळत होती. यावेळी धनराज जंजाळे हा तिच्याशी बोलताना दिसून आला. काही वेळाने बालिका दिसत नसल्याचे लक्षात येताच तिच्या आईने परिसरात शोध सुरू केला.
दरम्यान, दुकानदार विशाल अण्णा पाटील यांनी बालिकेला संशयितासोबत दुसऱ्या गावाच्या दिशेने जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर विशाल अण्णा पाटील आणि गजानन सुभाष कोळी यांनी संशयिताच्या घरी जाऊन पाहणी केली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने संशय बळावला. आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी संबंधित नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.
यानंतर संशयिताचा नातेवाईक विलास बाबुराव जंजाळे घटनास्थळी आला. त्याच्या सांगण्यावरून घराचा दरवाजा उघडण्यात आला. घरातील अंधाऱ्या कोपऱ्यात बालिका आढळून आली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बालिकेची सुटका करून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
कुटुंबीयांनी बालिकेकडून माहिती घेतल्यानंतर संशयिताने तिला घरात नेऊन दरवाजा बंद केल्याचे समोर आले. यानंतर कुटुंबीयांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी धनराज दगडू जंजाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीविधी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जोगलखेडा परिसरात खळबळ उडाली आहे.


