Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईममुक्ताईनगर

गुटखा बंदी असतानाही गुटख्याने भरलेल्या बोलेरोची दुचाकीला धडक; दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, मुक्ताईनगर शहरातून गुटख्याची गाडी निघालीच कशी? पोलिसांच्या गस्तीतून वाहन गेले कसे?

मुक्ताईनगर/बोदवड. मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | महाराष्ट्रात गुटख्याच्या विक्री व वाहतुकीवर बंदी असतानाही गुटख्याचा माल असल्याचा संशय असलेल्या बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास बोदवड हद्दीतील शेलवड फाट्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून गुटख्याचा माल घेऊन बोलेरो वाहन बोदवड हद्दीतून जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच वाहनाची दुचाकीला धडक झाल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पळासखेडा व शेलवड परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनास्थळी असलेल्या बोलेरो वाहनाची पाहणी केली असता, त्यामध्ये विमल गुटख्याच्या पोत्यांमध्ये भरलेला माल आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक नेमकी कोणाच्या माध्यमातून आणि कोणत्या मार्गाने केली जात होती, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुक्ताईनगर शहरातून गाडी निघालीच कशी?

विशेष म्हणजे मुक्ताई पालखी आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर शहरात पोलिसांची गस्त व बंदोबस्त चांगल्या प्रकारे असल्याचे सांगितले जात होते. असे असताना गुटख्याच्या पोत्यांनी भरलेले वाहन मुक्ताईनगर शहरातून पुढे गेलेच कसे? वाहनाची तपासणी का झाली नाही? या वाहनाला मार्गात कुठेही अडवण्यात आले नाही का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

मुक्ताईनगर–पूर्णाड फाटा मार्गावरून गुटख्याची वाहतूक करणारे वाहन शहरातून सुसाट निघून जाते आणि पुढे बोदवड हद्दीत अपघात घडतो, ही बाब अत्यंत गंभीर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पोलिसांनी बोलेरो ताब्यात घेतली

अपघाताची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल मोहन पाटील व प्रभाकर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित बोलेरो वाहन ताब्यात घेतले असून, वाहनातील मालाची अधिकृत पाहणी व तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातातील मृत व्यक्तीला न्याय मिळावा आणि बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

पत्रकार परिषद घेण्याची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी दि. १९ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात येत आहे.

अपघाताचे नेमके कारण, बोलेरो वाहनातील मालाचे स्वरूप व अधिकृत प्रमाण, माल कोठून आला, तो कुठे नेला जात होता, वाहन मुक्ताईनगर शहरातून कसे पुढे गेले आणि या प्रकरणात कोणावर कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली, याबाबत पोलिस प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुटखा बंदी असताना गुटख्याने भरलेले वाहन रस्त्यावर धावत असेल, तर त्यामागील संपूर्ण साखळीचा तपास होणार का? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!