ब्रेकिंग : उष्णतेची लाट, राज्यात उष्माघाताच पहिला बळी
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये ही घटना घडली आहे. गणेश राधेश्याम कुलकर्णी असं या तरुणाचं नाव आहे. उष्माघाताने गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्हयातल्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथे एका खासगी कंपनीत गणेश कुलकर्णी वय तीस वर्ष हा तरुण कामाला होता. गणेश हा जैनपूर मार्गाने बिडकीनकडे येत असताना अचानक चक्कर येऊन कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस आला. यावेळी त्याला तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मात्रे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. गणेशचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.
राज्यात उष्णतेची लाट
राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उकाड्यातही वाढ होताना दिसत आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मंगळवारपासून काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाल्याने राज्यातील तापमान वाढणार आहे. विदर्भातील कमाल तापमान ४२ अंश सेल्सियस पार पोहचण्याची शक्यता आहे.