संभ्रम दूर : जळगाव जिल्ह्यात हॉटेल व दुकाने २४ तास खुली राहणार, एसपींनी दिल्या सूचना
राज्य सरकारच्या आदेशाचे पालन होणार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्य सरकारने मद्यविक्रीची दुकाने वगळता इतर सर्व दुकानं, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून यासंदर्भात अद्यादेशही जारी केला आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे लक्षात आले आहे. रात्री १० नंतर दुकाने उघडी ठेवल्यामुळे काही व्यापाऱ्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून नियम स्पष्ट केले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सहायक कामगार आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांना लेखी पत्र देऊन संबंधित कायद्याची आठवण करून दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना जारी केल्या असून, विनाकारण दुकाने बंद करण्यास सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता जिल्ह्यात २४ तास व्यवसायासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील हॉटेल्स, दुकाने, मॉल्स, सिनेमागृहे आणि इतर अस्थापना २४ तास (२४x७) सुरू ठेवण्याची परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘नाईटलाईफ’ आणि व्यवसायवाढी साठी हा निर्णय घेण्यात आला असून, केवळ बार, परमिट रूम, मद्यविक्री दुकाने आणि हुक्का पार्लर या नियमातून वगळण्यात आले आहेत.
आदेशातील महत्वाचे मुवद्दे
हॉटेल्स, उपाहारगृहे, खाद्यगृहे, दुकाने, मॉल, नाट्यगृहे व इतर मनोरंजनाचे ठिकाणे ही २४/७ तास सुरू राहणारी अस्थापने आहेत.
यात अपवाद म्हणून देशी/विदेशी मद्यपानगृहे, बार, परमिट रूम आणि हुक्का पार्लर या नियमातून वगळले असून त्यांच्यावर निर्बंध कायम आहेत.
नियम व अटी: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ अंतर्गत सर्व सुरक्षा व कामाच्या अटींचे पालन करणे अनिवार्य आहे.
कर्मचारी हित :: कामगारांना आठवड्यातून एक दिवस पगारी सुट्टी आणि २४ तास सतत विश्रांती देण्याची तरतूद करणे आवश्यक आहे.
या निर्णयामुळे राज्यातील व्यापार व्यवहारांना बळ मिळणार असून, ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होणार आहे.
हा निर्णय विशेषतः मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमधील व्यापाराला अधिक चालना देण्यासाठी घेण्यात आला आहे .
जळगाव मध्ये या बाबत अडचणी येत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेत सहायक कामगार आयुक्तांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.
काय आहे नियम
दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ नुसार, ज्या दुकानांकडे वैध शॉप ॲक्ट परवाना आहे आणि १० पेक्षा कमी कामगार आहेत अशांन दुकाने २४ तास सुरू ठेवण्यास शासनाची परवानगी आहे. मद्य विक्रीची दुकाने सोडून इतर हॉटेल्स व व्यावसायिक दुकाने रात्रीच्या वेळी सुरू ठेवता येतील.
दरम्यान, परमिट रुम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि अशा सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केली जाते, तसेच वाईन आणि सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. अशा आस्थापना २४ तास सुरु ठेवता येणार नाहीत.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, कलम ११ नुसार, राज्य सरकारला विविध क्षेत्रांसाठी किंवा आस्थापनांच्या वेगवेगळ्या वर्गांसाठी सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचा अधिकार आहे. शासनाने १९ डिसेंबर २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक, तसेच वाईन आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकाने यांच्याच वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. नंतर ३१ जुलै २०१९ रोजी थिएटर आणि सिनेमा गृहांना या यादीतून वगळण्यात आले.
२४ तास काय सुरू राहणार?
सर्व दुकाने
निवासी हॉटेले
उपाहारगृहे
खाद्यगृहे
थिएटर
सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा
इतर आस्थापना
काय बंद राखणार?
मद्यपान गृहे
बार परमिट रूम
हुक्का पार्लर
देशी बार

