केंद्रीय मंत्री रक्षा खडसे संतापल्या..! आमदारांना महत्त्व देता. “खासदार काय उडत गेले का?”
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जिल्हा नियोजन समितीची बैठक जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचेसह जळगाव च्या खासदार स्मिता वाघ यांसह जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या आयुक्तांसह सर्व विभागांचे अधिकारी देखील या बैठकीत होते. या बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा “रौद्र अवतार” पाहायला मिळाला.
या बैठकीत जळगाव वीज वितरण कंपनीच्या खांबांचे स्थलांतर करण्याचा विषय चर्चेत आला. अधिकाऱ्यांनी या कामाची माहिती देण्यात सुरुवात केली. मात्र बैठकीत माहिती दिली जात असतानाच मंत्री रक्षा खडसे यांनी या वेळी कामकाजाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि मंत्री रक्षा खडसे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. वातावरण तापले आणि मंत्री खडसे यांनी अक्षरशा रौद्र अवतार धारण केला.
या योजनेसाठी साठ टक्के निधी केंद्र शासनाकडून दिला जातो. योजना चांगल्या प्रकारे राबविली जावी यासाठी खासदार सातत्याने पाठपुरावा करतात. मात्र प्रशासन खासदारांची उपेक्षा करते. खासदारांना टाळण्याचे कारण काय? या योजनांच्या उद्घाटनाला तुम्ही आमदारांना महत्त्व देता. आणि केंद्राचा निधी असूनही खासदार काय उडत गेले का? यापुढे असे प्रकार घडल्यास खपवून घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांची थेट लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करीन, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत दि.२३ फेब्रुवारी सोमवर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. कामचुकार अधिकारी आणि प्रोटोकॉल धाब्यावर बसवणाऱ्या वीज व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची खडसे यांनी अक्षरशः खरडपट्टी केली. केंद्राचा ६० टक्के निधी असताना खासदारांना अंधारात ठेवून आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटन उरकताय का? अशा शब्दांत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या पुलाच्या प्रश्नावरून रेल्वे इंजिनिअर्सना दुसऱ्या देशात तपासणी करताय का? असा खोचक सवाल करत कानउघडणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून पिंपळगाव आणि वरणगावच्या रेल्वे गेटचा प्रश्न सुटत नसल्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे कमालीच्या संतापल्या होत्या. तपासणीच्या नावाखाली किती वेळ घालवणार? असा सवाल करत त्यांनी रेल्वेच्या इंजिनिअर्सना धारेवर धरले. तुमच्या डिझाईनमध्येच दोष आहे. जर शेतकऱ्यांना त्रास झाला तर ते जमिनी देणार नाहीत. वेळ पडल्यास आम्ही स्वतः शेतकऱ्यांना सांगू की ते गेट तोडून टाका, असा इशाराच त्यांनी दिला. रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छतेवरूनही त्यांनी व्यवस्थापनाचे वाभाडे काढले.
एअरपोर्ट विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता आणि ब्रिजच्या कामाला होणाऱ्या विलंबावरही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ४ किलोमीटरच्या रस्त्याला ६ महिने का लागतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एअरपोर्ट ते अजिंठा चौफुलीपर्यंतच्या पथदीपांसाठी (लाईट्स) येणारा ५ कोटींचा खर्च जिल्हा परिषद आणि मनपा यांनी डीपी मधून मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तर याद राखा!
वीज विभागाच्या कामकाजावर बोलताना रक्षा खडसे यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात ११७ पैकी ७३ उपकेंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच्या उद्घाटनाची साधी सूचनाही खासदारांना दिली जात नाही. आमदारांच्या मुलीकडून सबस्टेशनचे उद्घाटन केले जाते, हे चुकीचे आहे. केंद्राचा ६० टक्के निधी असलेल्या योजनांमध्ये खासदारांना डावलले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. इथून पुढे आमदार आणि खासदार यांच्या तारखा घेऊनच कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच या बैठकीला दांडी मारणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह ‘न्हाई’चे उपसंचालक साळुंखे यांच्या अनुपस्थितीची खडसे यांनी गंभीर दखल घेतली. या अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जळगाव जिल्ह्यात आमदार आणि खासदार दोन्ही भाजपचे आहेत. तरीही जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत हा वाद पहायला मिळाल्याने तो चर्चेचा विषय आहे. मात्र केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा संताप व रौद्र अवतार पाहून अधिकारी व उपस्थित सर्वांनाच धक्का बसला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
