नशिराबाद – सुनसगाव – बोदवड रस्त्यावरील जि. प. प्राथमिक केंद्र शाळेची जीर्ण व कमकुवत इमारत जमीनदोस्त करा- मागणी
नशिराबाद. मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद येथील नशिराबाद – सुनसगाव – बोदवड रस्त्यावरील खंडेराव मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेची जीर्ण व कमकुवत झालेली इमारत नागरिक,व्यापारी तसेच विद्यार्थी वर्गासाठी गंभीर धोका ठरत असून, ही इमारत तातडीने जमीनदोस्त करण्यात यावी अशी मागणी नशिराबाद येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.या इमारतीस अनुसरून संबंधित विभागाकडे बरेच वेळेस प्रस्ताव व अहवाल पाठवूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही पाठपुरावा किंवा सकारात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या कमकुवत व मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांच्या तसेच विविध योजनांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या जीर्ण इमारती पाडण्याबाबत ९ जानेवारी २०१२ व ८ जून २०१२ च्या शासन परिपत्रकात सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ठराव क्र. ६९० नुसार शिक्षण व क्रीडा समितीच्या शिफारशीवरून एरंडोल, भडगाव, पारोळा, चोपडा व जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील जीर्ण वर्गखोल्यांच्या निर्लेखनास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये जि.प. प्राथमिक केंद्रशाळा नशिराबाद येथील तीन वर्गखोल्या पाडण्याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन वेळा गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे संबंधित इमारत पाडण्याचा प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. मात्र त्यावर अद्याप कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. संबंधित कमकुवत झालेल्या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. तरी देखील प्रशासनाकडून आवश्यक ती दखल घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या कमकुवत व जीर्ण इमारतीचा धोका अधिक वाढला आहे. नगरपरिषद नशिराबादकडून शहरातील धोकादायक व जीर्ण बांधकामांवर विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेत संबंधित शाळा इमारतीचाही समावेश करून जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दर शुक्रवारी या इमारतीच्या खालच्या बाजूस आठवडे बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. अनेक विक्रेते या इमारतीलगत बसत असतात. तसेच परिसरात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सतत वर्दळ सुरू असते. शेजारीच मुख्य नशिराबाद- बोदवड रहदारीचा रस्ता असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रशासन एखाद्या मोठ्या घटनेच्या प्रतीक्षेत आहे की काय असे चित्र दिसून येत आहे.भविष्यात कोणतीही मोठी घटना होऊन जीवितहानी झाल्यास त्यास सर्वोतोपरी प्रशासनान जबाबदार राहील. वेळीच उपाययोजना करून जीर्ण इमारत तातडीने पाडावी असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


