क्राईमधुळे

पाच हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षकाला लाचलुचपत विभागाकडून अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांचे सोबत इतर ०५ महिला नर्सिंग ऑफिसर असे दि. १४ व १५ एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांचेकडुन गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता. त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावुन घेवुन त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी १,०००/- रुपये असे एकुण ५०००/- रुपये जमा करुन मला आणुन दे, नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना सांगितले होते.


तकारदार यांना कर्मचा-यांकडुन पैसे जमा करुन सदरची लाचेची रक्कम ५०००/- रुपये अशी रक्कम पारसकर यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. २० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात समक्ष येवुन तकार दिली होती. सदर तकारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान संशयित चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी तक्रारदार यांचेकडे प्रती गैरहजरत कर्मचा-यांकडुन १,०००/- रुपये याप्रमाणे ५०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम सोमवार दि. २२ रोजी त्यांचे एस.आर.पी. कॉलनी, नकाणे रोड, धुळे येथील राहते घरी स्विकारते वेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकुन दिली. त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन चंद्रकांत पारसकर, सहायक समादेशक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांचे विरुध्द पश्चिम देवपुर पो.स्टे. जि. धुळे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.


सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे. कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!