भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव ; मुंबईतील वृद्ध महिलेची ६५ लाखांची सायबर फसवणूक – जळगावातील चौघे अटकेत

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | मुंबईतील एका प्रौढ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावत तब्बल ६५ लाख रुपये उकळल्याच्या गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात मुंबई सायबर क्राईम शाखेने मोठी कारवाई करत जळगावातील चार आरोपींना अटक केली आहे.

मुंबई सायबर क्राईमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव यांच्या पथकाने नशिराबाद येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयेश काळे (वय २६, रा. तरसोद, जि. जळगाव) याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर संकेत सोपान महाजन (वय २८, रा. मेहरुण) व यशवंत शालिक धांडे (वय २९, रा. मेहरुण) यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींनी उघड केले की, मुख्य सूत्रधाराच्या सांगण्यावरून ते मुंबईतील फिर्यादी महिलेच्या घरी गेले आणि सुमारे २५ लाख रुपये रोख स्वरूपात घेऊन जळगाव येथे आणले. ही रक्कम त्यांनी विनोद प्रकाश अत्तरदे (वय ३८, रा. खेडी, जि. जळगाव) याच्याकडे दिली. त्यानंतर अत्तरदे यालाही अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपये रोख जप्त केले असून उर्वरित रक्कम इतर मार्गाने विल्हेवाट लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुख्य आरोपी जयेश काळे याच्याकडून दीड लाख रुपये रोख व अंदाजे पाच तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात जयेश काळे हा यापूर्वी कंबोडियात नोकरी करत असल्याची बाब उघड झाली आहे. सर्व आरोपींनी संगनमताने ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून महिलेची भीती वाढवून मोठी रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपींना पुढील तपासासाठी मुंबई येथील सायबर पोलीस ठाणे (पश्चिम विभाग, बांद्रा) येथे हलविण्यात आले असून तपास पूनम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून आर्थिक व्यवहारांची साखळी, संपर्क व डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. दरम्यान, ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या सायबर फसवणुकीच्या घटना आता ग्रामीण भागातही पोहोचत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी संशयास्पद फोन कॉल्स, धमक्या किंवा ऑनलाईन व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!