पोत्यांमध्ये आता ५० किलो पर्यंतच भरावा लागणार शेतमाल
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्य शासनाने कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत शेतीमालाच्या गोण्यांचे वजन ५० किलोपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्व्हेन्शन क्र. १२७ नुसार हा निर्णय घेण्यात आला असून, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतमाल ५० किलोच्या गोणीमध्ये भरावा लागणार आहे. यापुढे ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या भरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे ६० किंवा ८० किलोची पोती आता इतिहासजमा होणार आहेत.
कामगारांकडून जड वजनाची मालवाहतूक केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, या उद्देशाने केंद्र शासनाने राज्य शासनाला याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार कामगार आयुक्तांनी परिपत्रक जारी केले होते, तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने संबंधित मंडळांना याची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले होते.
कांदा, बटाटा व इतर शेतमालाच्या ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलताना कामगारांना होणारा त्रास लक्षात घेऊन गोण्यांचे वजन मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सर्व बाजार समित्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करावी, संबंधितांना सूचना द्याव्यात व ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्यांची हाताळणी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बाजार समित्यांचे सचिव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व पणन संचालक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, या नियमामुळे बाजार समित्यांचे कामकाज बाधित होणार नाही, याचीही काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे कामगारांचे आरोग्य जपत बाजार व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र दिसून येत आहे. हमालाच्या खांद्यावरील ओड्रो कमी झाले असून, शेतकऱ्यांना आता ५० किलोच्या गोण्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी न्यावा लागणार आहे.
ओझे कमी : पोते आता १ क्विंटलवरून ५० किलोवर
पूर्वी शेतमाल मोठ्या पोत्यांमध्ये भरल्या जात होता. त्यात ११० ते ११५ किलो शेतमाल सामावत होता. कालांतराने एक क्विंटलपेक्षा जास्त शेतमालाचे पोते उचलण्यास हमालांनी नकार दिला. त्यानंतर ६० किलोचे पोते बाजारात आले. आता सद्यस्थितीत ६० किलोच्या पोत्यात शेतमाल भरल्या जात आहे. या निर्णयानंतर आता ५० किलोच शेतमाल पोत्यात भरावा लागेल. पोत्याचा आकार खताच्या गोणीप्रमाणे छोटा होणार आहे. त्या मुळे खर्च मात्र वाढणार आहे.
