निष्काळजीपणाचा कळस.. ! उंदीर, मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह;खडबडजनक घटना
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )। कोरोनाने देश हैराण झालेला असता रुग्णांच्या संख्येत दररोज सातत्याने वाढ होत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. मात्र याच दरम्यान आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा चार दिवसांपासून शवविच्छेदन गृहातच पडून होता. हा मृतदेह अक्षरशः सडला होता. याशिवाय उंदीर आणि मुंग्यांनी मृतदेहाचा बहुतेक भाग खाल्ला असल्याची धक्कादायक घटना समोर आली,कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणाने कळस गाठला आहे.
प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या आजमगडमधील जिल्हात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महिलेचा मृतदेह सडल्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरला होता. त्यामुळेच नंतर ही घटना उघडकीस आली. चार दिवस हा मृतदेह शवविच्छेदनगृहात पडून होता. मृतदेहाला मुंग्या आणि उंदीर खात राहिले. मात्र, तरीही या गोष्टीची कोणालाच कल्पना कशी नव्हती असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 29 एप्रिलला संध्याकाळी बिलरियागंज मध्ये रस्त्यावर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. 32 वर्षीय अज्ञात महिलेला रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी पाच वाजता रुग्णालयात दाखल केलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी 30 एप्रिलला सकाळी महिलेचा मृत्यू झाला. यानंतर कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवला. सोबतच पोलिसांनाही शवविच्छेदन प्रक्रियेसाठी याबाबतची माहिती दिली. मात्र त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मृतदेह हा तसाच पडून राहिल्याने उंदरांनी व मुंग्यांनी तो खाल्ला .