दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील ‘राखफेम’ कार्यकारी अभियंत्याचे तडकाफडकी निलंबन, आणखी काही अधिकारी रडारवर
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) ने भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणी कार्यकारी अभियंता श्री. उमेश रघुनाथ ढोक यांना आजपासून तात्काळ निलंबित केले आहे. असे आदेश महानिर्मितीच्या मुख्य अभियंता (पर्यावरण व सुरक्षितता व गोपालमा-२) प्रभारी तथा सक्षम अधिकारी शैलेश पडोळ यांनी जारी केले आहेत.
दिपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील अधिकारापेक्षा नियमबाह्य खरेदी करणे, राखेतील भ्रष्टाचार, कामकाजातील अनियमिततेच्या कारणास्तव याना निलंबित करण्यात आले आहे. या नंतर आणखीही यात गुंतलेले अधिकारी रडारवर असून प्रदूषणाला आणि जैवविविधतेला बाधित करणाऱ्या इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर भविष्यात ‘प्रकाशगड’ आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच ढोक ने त्याच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होऊ नये म्हणून माहिती अधिकाराच्या अर्जांची माहिती देण्यास टाळाटाळ करणे हे कार्यालयीन कामकाजातील गंभीर अनियमितता दिसून आली आहे. याची दखल ऊर्जामंत्री सचिवालयाने घेतल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
श्री. ढोक यांच्या कार्यकाळात (प्रतिनियुक्तीवर असताना) त्यांनी अनेक गंभीर प्रकार आढळून आले आहेत. याचा अहवाल तयार करण्यात आला असून त्यातील काही प्रमुख अनियमितता नोंदवल्या गेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे….
A) खरेदी प्रक्रिया व DOP (Delegation of Power) संबंधी निरीक्षणे:
१. एकाच आयटम कोडचा विविध कामांच्या प्रस्तावांसाठी वापर.
२. चुकीच्या GL बजेट हेडचा वापर.
३. वर्क ऑर्डरचे स्प्लिटिंग (विभाजन) करणे.
४. वारंवार समान बोलीदार व L1 बोलीदार येत असणे.
५. गट ७६ साठी CGM (F) यांच्या ई-मेलद्वारे बजेट नियंत्रण पाळले नाही.
६. GL Account Code ७१/७६ अंतर्गत कोणत्याही खरेदीसाठी ED (O&M) यांची पूर्व मंजुरी घेतली नाही.
७. कामाच्या व्याप्ती (Scope of Work) व समान स्वरूपाच्या कामाच्या व्याख्येत विसंगती.
B) काम पूर्णत्व व पेमेंट संबंधी निरीक्षणे:
– पेमेंट केवळ सेफ्टी ऑफिसर किंवा सेक्शन हेड्स यांच्या प्रमाणपत्रावर आधारित दिले जात होते.
भुसावळ केंद्रात (BTPS) पेमेंटचे प्रमाण खालीलप्रमाणे:
– ७६ गट कामे: सुमारे ४३% पेमेंट
– ७६ गट सप्लाय: सुमारे ३४% पेमेंट
– ७१ गट कामे: सुमारे ३३% पेमेंट
– ७१ गट सप्लाय: सुमारे ८७% पेमेंट
समितीच्या या निरीक्षणांमुळे श्री. ढोक यांनी नियमांप्रमाणे कामकाज केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
निलंबनातील अटी
दिनांक- १८ मार्च २०२६ तात्काळ निलंबन.
नियम:महानिर्मिती कर्मचारी सेवाविनियम २०१५ मधील नियम क्र. ८८ (क) (एक) व अनुसूची अकरा (अनुसूची “ग”) अन्वये.
हजेरी: दर सोमवारी सकाळी ११:०० वाजता मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा येथे हजेरी द्यावी.
भ्रष्ट ढोक ची पार्श्वभूमी अशी…
श्री. उमेश रघुनाथ ढोक (भ.नि.नि.क्र. ०२२५१४३४/८८४०) हे महानिर्मिती सांघिक कार्यालय, मुंबई येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. मुख्य अभियंता (तांत्रिक) यांच्या आदेशानुसार २३ मे २०२५ रोजी भुसावळ केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२५ रोजी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. भुसावळ केंद्रात त्यांना अधीक्षक अभियंता (प्रशासन) यांचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला होता. ही निलंबनाची कारवाई महानिर्मितीने भुसावळ केंद्रातील आर्थिक पारदर्शकता व नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीकोनातून घेतली आहे. निलंबन कालावधीत त्यांच्यावर विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे.

