शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक प्रसिद्ध! २ ते १४ नोव्हेंबर दरम्यान सुट्टी; १६ नोव्हेंबर पासून दुसरे सत्र सुरू
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील सत्ररचना आणि सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. सुट्टीनंतर सोमवार, १६ नोव्हेंबरपासून शाळांमध्ये दुसरे सत्र सुरू होईल.
प्रथम सत्र ३१ ऑक्टोबरपर्यंत
माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र १५ जून २०२६ रोजी सुरू झाले असून, ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर दिवाळीची सुट्टी लागू होईल.
दिवाळीची सुट्टी १३ दिवसांची
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सोमवार, २ नोव्हेंबर ते शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची दीर्घ सुट्टी असेल. या काळात धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा आणि भाऊबीज यांसारख्या सणांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी तसेच कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टी मिळणार आहे.
१६ नोव्हेंबरपासून दुसरे सत्र
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होतील. दुसरे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ ते १ मे २०२७ या कालावधीत चालणार आहे. त्यानंतर ३ मे ते १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी राहणार आहे.
एकूण सुट्ट्यांवर मर्यादा
माध्यमिक शाळा संहितेनुसार संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्यांची एकूण संख्या ७६ दिवसांपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांनी जाहीर वेळापत्रकानुसार शैक्षणिक सत्रांचे आणि सुट्ट्यांचे नियोजन करणे अपेक्षित आहे.
महत्त्वाचे वेळापत्रक……
प्रथम सत्र: १५ जून ते ३१ ऑक्टोबर २०२६
दिवाळी सुट्टी: २ ते १४ नोव्हेंबर २०२६
दुसरे सत्र सुरू: १६ नोव्हेंबर २०२६
दुसऱ्या सत्राचा शेवट: १ मे २०२७
उन्हाळी सुट्टी: ३ मे ते १४ जून २०२७


