दांडियातील वाद मिटवणे पडले महागात! दसऱ्याच्या रात्री जळगावात रक्तरंजित थरार; चॉपर हल्ल्यात एक ठार, दुसरा गंभीर जखमी
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण उत्साहात साजरा होत असतानाच जळगाव शहरातील खेडी शिवारातील माऊली नगर परिसरात रक्तरंजित घटना घडली. नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या गरबा-दांडिया कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या किरण विठ्ठल पाटील (वय ४४) यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
वाहनाच्या प्रखर प्रकाशावरून वाद
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडी शिवारातील माऊली नगर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा-दांडियाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी काही महिला घराबाहेरील ओट्यावर बसून कार्यक्रम पाहत होत्या. दरम्यान, किशोर छगन पाटील हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाहनाचा प्रखर प्रकाश महिलांच्या चेहऱ्यावर पडल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेली शाब्दिक चकमक पुढे वाढत गेली.
या वादातून रोहित पाटील आणि मयूर पाटील यांनी किशोर पाटील यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या किरण पाटील यांच्यावर हल्ला
वाद मिटवण्यासाठी किरण विठ्ठल पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर किशोर पाटील हेही जखमी झाले.
किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या किरण पाटील यांना जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी
घटनेनंतर जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किरण पाटील यांना मृत घोषित केले, तर किशोर पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनीही रुग्णालयात जाऊन मृताच्या नातेवाईकांची व मित्रपरिवाराची भेट घेत सांत्वन केले.
दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रोहित पाटील आणि मयूर पाटील या दोन संशयितांना काही तासांत ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हे दोघेही १९ ते २० वर्षे वयोगटातील असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
या घटनेमागील नेमके कारण, वादाला अन्य काही पार्श्वभूमी होती का आणि हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

