Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीयसामाजिक

नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी ! ३० ऑगस्टला कोथळीत राजकीय, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

श्रीक्षेत्र कोथळी येथे अखंड हरिनाम सप्ताहाने भक्तिमय वातावरण

कोथळी, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे नाथाभाऊ यांच्या अमृत महोत्सवी ७५व्या वर्षात पदार्पणानिमित्त श्रीक्षेत्र कोथळी येथील पावन श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात अध्यात्म, भक्ती आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा’ भक्तिमय वातावरणात सुरू असून, या सोहळ्याला राज्यभरातून मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

नाथाभाऊंच्या ७५व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे भव्य अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मुख्य सोहळ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला वेग आला आहे.

या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांतदादा पाटील हे दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी कोथळी येथे उपस्थित राहणार आहेत. तर दि. ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी राज्याच्या विविध राजकीय प्रवाहांतील दिग्गज नेत्यांची मांदियाळी कोथळीत जमणार आहे.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर, महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार चैनसुख संचेती, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच मध्यप्रदेशच्या माजी मंत्री अर्चनाताई चिटणीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोथळी नगरी सज्ज; भक्तीमय वातावरणात भव्य सोहळ्याची तयारी

एकीकडे श्रीक्षेत्र कोथळी येथे अखंड हरिनाम सप्ताह, संत मुक्ताई चरित्र व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे, तर दुसरीकडे ३० ऑगस्टच्या भव्य अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी प्रशासन, आयोजक आणि कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे अध्यात्म आणि राजकारणाचा अनोखा संगम घडविणारा नाथाभाऊंचा अमृत महोत्सवी सोहळा अवघ्या खानदेशाचे लक्ष वेधून घेणार, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!