MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण ; नंदुरबारमध्ये मुंबई क्राईम ब्रँचची धडक तपासणी
नंदुरबार. मंडे टु मंडे न्यूज | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई क्राईम ब्रँचचे पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले असून, संशयितांच्या घरांसह संबंधित ठिकाणी झडती व तपासणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने संशयित आरोपी अमृत पाटील आणि गौरव पाटील यांच्या घरांची झडती घेतली. तसेच नंदुरबार येथील कौटिल्य अकॅडमीमध्येही तपासणी करण्यात आली आहे. गेल्या सुमारे दहा तासांपासून पथकाकडून विविध ठिकाणी तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
तपासात महत्त्वाचे धागेदोरे मिळणार?
तपासणीदरम्यान पथकाच्या हाती नेमके कोणते पुरावे किंवा कागदपत्रे लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती असल्याने या कारवाईबाबत गोपनीयता पाळली जात असल्याचे समजते.
दरम्यान, प्रवीण पाटील यांना सोबत घेऊन मुंबई क्राईम ब्रँचकडून विविध ठिकाणी चौकशी व तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या राहत्या घराचीही तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
MPSC कडून भरती प्रक्रिया रद्द
औषध निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत पेपरफुटीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. आमदार रोहित पवार यांनीही या कथित पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि अखेर MPSCने संबंधित भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
WhatsApp चॅटमुळे तपासाला नवे वळण?
या प्रकरणात नंदुरबारमधील लोकेश उर्फ गौरव पाटील यांनी प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार MPSCकडे केली होती. या तक्रारीसोबत ऋतुजा पाटील यांच्यासोबत झालेल्या WhatsApp संभाषणाचे स्क्रीनशॉट जोडण्यात आल्याची माहिती आहे.
या स्क्रीनशॉटमध्ये दोघांमधील संभाषणासोबत काही फोटोही असल्याचे सांगितले जात आहे. प्रश्नपत्रिकेशी संबंधित काही दावे किंवा संवाद या चॅटमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संभाषणाचा कथित पेपरफुटी प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास यंत्रणांकडून केला जात आहे.
सध्या मुंबई क्राईम ब्रँचकडून सुरू असलेल्या तपासात नेमके कोणते पुरावे हाती लागतात आणि या प्रकरणामागील संपूर्ण सत्य काय समोर येते, याकडे MPSC परीक्षार्थींसह राज्याचे लक्ष लागले आहे.


