निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील ‘या’ ९ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे आता भारत निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत एक पाऊल पुढे टाकले आहे. निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत तब्बल ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल ९ पक्षांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी पक्षांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये काही पक्ष निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे पक्षांचे अस्तित्व संपवत त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयाने प्रभावित कोणताही पक्ष ३० दिवसांच्या आत या निर्णयाविरोधात अपील करू शकतो. सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष आहेत.
निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईमध्ये मान्यता रद्द झालेल्या पक्षांमध्ये सर्वाधिक पक्ष हे उत्तर प्रदेशमधील आहेत. उत्तर प्रदेशमधील तब्बल ११४ पक्षांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश खालोखाल दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून दिल्लीतील २७ पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईनंतर देशभरात केवळ सहा राष्ट्रीय तर ६७ प्रादेशिक पक्ष राहिलेले आहेत. राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस, भाजप, बहुजन समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी (आप) यांचा समावेश होत आहे.
देशात एकुण राजकीय पक्ष किती?
निवडणूक आयोगाने काही राजकीय पक्षांची मान्यता रद्द केल्याने राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या संख्येत मोठा बदल झालेला नाही. मात्र, नोंदनीकृत आणि बिगर मान्यताप्राप्त पक्षांच्या संख्येत बदल झाला आहे. आयोगाच्या कारवाईपूर्वी एकुण २ हजार ८५४ नोंदणीकृत पक्ष होते. मात्र आता त्यांची संख्या २ हजार ५२० येवढी झाली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या पक्षांची मान्यता रद्द?
- नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी
- अवामी विकास पार्टी
- भारतीय संग्राम परिषद
- द लोक पार्टी ऑफ इंडिया
- युवा शक्ती संघटना
- बहुजन रयत पार्टी
- नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी
- इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया
- पीपल्स गार्डियन

