न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्या मंदिरात प्रवेशोत्सव उत्साहात; ग्रंथदिंडी, वृक्षारोपण व संगणक कक्षाचे उद्घाटन
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्या मंदिरात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकांची ग्रंथदिंडी पालखीच्या स्वरूपात काढण्यात आली. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यानंतर सन्माननीय संचालक मंडळ व पालकांच्या हस्ते बुद्धीची देवता श्री गणेश आणि विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. शालेय परिपाठाला सुरुवात करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील वार्षिक परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनी आरोही प्रशांत महाजन हिचा वाढदिवस तसेच नर्सरी या नव्याने सुरू करण्यात आलेल्या वर्गाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून शाळेच्या बगीच्यात विद्यार्थी, पालक व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष विनायक वाणी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत अभ्यासात प्रगती करण्याचे आवाहन केले.
प्रवेशोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते संगणक कक्ष व ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नशिराबाद नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना आधुनिक संगणक ज्ञान मिळावे, या उद्देशाने संगणक कक्ष सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी, कार्याध्यक्ष तथा नगराध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक जनार्दन माळी, राजेश पाटील, ॲड. प्रदीप देशपांडे, मुख्याध्यापक प्रवीण महाजन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन शीतल चावरे, नंदिनी नाथ, संगीता जोशी आणि मंगला पिंगळे यांनी केले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
