बनावट जन्मदाखला, ५ अपत्ये, निवडणुकीत खोटी माहिती दिल्याचा आरोप, नगरसेवक अडचणीत
,
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी तसेच शासकीय कामात सोयीसाठी बनावट जन्मदाखले सादर केले तसेच ५ अपत्ये असताना ३ अपत्ये दाखवून खोटी माहिती दिल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. जळगाव महानगर पालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक जाकीर खान रसूल खान यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप माजी उपमहापौर तथा प्रतिस्पर्धी उमेदवार कुलभूषण पाटील यांनी केला आहे. गुरुवारी त्यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्त तसेच शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
२०२६ च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० ‘ड’ मधून जाकीर खान रसूल खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःला तीन अपत्ये असल्याचे नमूद केले होते. मात्र, माहिती अधिकारातून महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून मिळालेल्या कागदपत्रांनुसार त्यांना पाच अपत्ये असल्याचे आढळून आल्याचा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे.
यात आणखी धक्कादायक म्हणजे दोन मुलींच्या जन्मातील केवळ १५ दिवसांचे अंतर असल्याचे नोंदीत दिसून येते. महापालिकेच्या दाखल्यांनुसार पहिल्या अपत्याचा जन्मदिनांक २ सप्टेंबर २००० (नोंदणी दिनांक १३ सप्टेंबर २०००) असा आहे; तर दुसऱ्या अपत्याचा जन्मदिनांक १७ सप्टेंबर २००० दर्शविण्यात आला असून त्याची नोंदणी दिनांक १४ ऑगस्ट २००७ अशी आहे. या विसंगतीमुळे जन्मदाखल्यांमध्ये फेरफार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
निवडणुकीदरम्यान अपत्यांची खरी संख्या लपवून खोटी माहिती दिल्याचा तसेच महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाची दिशाभूल करून बनावट दाखले मिळवल्याचा आरोप तक्रारदार कुलभूषण पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
