बनावट दिव्यांग प्रमाणपत्र : जळगाव जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी निलंबित, ६२ कर्मचाऱ्यांना नोटीस
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शासनाच्या दिव्यांग व्यक्ती विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातही बनावट दिव्यांगांची तपासर्णी सुरू आहे. या तपासणीत जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध विभागा अंतर्गत ६६६ दिव्यांग कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली. त्या पडताळणीत जिल्हापरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळून आल्याने त्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.तर जिल्ह्यातील ६२ कर्मचाऱ्यांनी यूडीआयडी सादर केले नाहीत. म्हणून त्या ६२ कर्मचाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्राबाबत नोटीस बजावली आहे. तर
राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील दोन कर्मचाऱ्यांकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आढळून आल्याने जि.प. सीईओ मीनल करनवाल यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
पाचोरा पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहायक लेखा विक्रम सुरेश पाटील तसेच धरणगाव पंचायत समितीत कार्यरत कनिष्ठ सहायक लेखा संतोष लक्ष्मण पाटील यांची नियुक्ती दिव्यांग प्रवर्गातून करण्यात आली होती. या दोघांची पुनर्तपासणी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आली. त्यात विक्रम पाटील यांचे युडीआयडी कार्ड अल्पदृष्टी प्रवर्गातील ७० टक्के दिव्यांगत्वाचे असताना प्रत्यक्षात फक्त १० टक्केच दिव्यांगत्व असल्याचे निष्पन्न झाले. तसेच संतोष पाटील यांचे क्षीण दृष्टी प्रवर्गातील ४० टक्के दिव्यांगत्व होते. मात्र, केलेल्या तपासणीत त्यांची दिव्यांगत्व टक्केवारी शून्य टक्के आढळून आल्याने शासनाची दिशाभूल करून दिव्यांगत्वानुसार नोकरी मिळविल्याचे स्पष्ट झाले.त्या मुळे या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

