भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

न्हावी परिसरात जुगाराचा ‘धिंगाणा’! मारुळ रस्त्यावर नदीकाठी पत्त्यांचा डाव जोरात; पोलीस झोपलेत..की अर्थपूर्ण दुर्लक्ष?

भानुदास भारंबे.
[ संस्थापक संपादक ]
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या न्हावी गावात सध्या कायद्याची भीती उरली नसल्याचे चित्र दिसत आहे. न्हावी ते मारुळ या रस्त्यावर असलेल्या नदीकाठच्या परिसरात सध्या जुगाराचा मोठा अड्डा सुरू असून, याठिकाणी दिवसाढवळ्या पत्त्यांचे डाव रंगत आहेत. विशेष म्हणजे, या जुगाराच्या अड्ड्यामुळे परिसरातील शांतता धोक्यात आली असून तरुणाई व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहे. मात्र, तरीही पोलीस प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, न्हावी गावाकडून मारुळकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीचे पात्र लागते. याच नदीकाठी असलेल्या झाडीझुडपांचा आणि आडोशाचा फायदा घेत जुगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सकाळपासूनच या ठिकाणी दुचाकींची गर्दी जमायला सुरुवात होते. शेकडो रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंतची हार-जीत याठिकाणी राजरोसपणे सुरू असते.

या अड्ड्यावर केवळ स्थानिकच नव्हे, तर बाहेरगावांहून येणाऱ्या संशयास्पद लोकांचा वावर वाढला आहे. गावातून शेतीकामासाठी जाणाऱ्या मजुरांपासून ते कॉलेजला जाणाऱ्या तरुणांपर्यंत अनेकजण या पत्त्यांच्या खेळाकडे आकर्षित होत आहेत. जुगारात पैसे हरल्यानंतर चोरी, हाणामारी यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पोलीस प्रशासन कधी जागे होणार?
फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या या भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असताना बिट अंमलदारांना याची खबर नाही का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. की या अड्ड्यांना कुणाचे तरी ‘वरदहस्त’ लाभले आहेत? न्हावी-मारुळ रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या महिला आणि सामान्य नागरिकांना या जुगाराच्या अड्ड्यांमुळे असुरक्षित वाटू लागले आहे.

आता तरी खाकीचा धाक दिसेल का?
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन न्हावी परिसरातील या ‘मिनी गोवा’ बनलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकावी आणि संबंधित जुगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.                         नदीकाठी सुरू असलेला हा जुगार म्हणजे गावाच्या संस्कृतीला लागलेली कीड आहे. अनेक घरांचे संसार यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून हे अड्डे उखडून टाकावेत, अन्यथा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल.
— संतप्त ग्रामस्थ, न्हावी…….{..पुढच्या बातमीत…फैजपूर शहर व परिसरातील जुगार अड्डे : सावदा परिसरातील जुगार अड्डे बंद असल्याने फैजपूर शहर व परिसरातील जुगार अड्ड्यांना सुगीचे दिवस }

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!