भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

jalgaon

टोल नाक्यावर गॅस टँकरची ट्रकला भीषण धडक; भीषण आगीत चालक- वाहकाचा जागीच मृत्यू, जळगाव जिल्ह्याला हादरवणारी घटना

जळगाव. मंडे टू मंडे न्यूज | जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सबगव्हाण टोलनाक्याजवळ शनिवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. भरधाव गॅस टँकरने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानंतर टँकरने पेट घेतला. या भीषण आगीत टँकरमधील चालक व क्लिनर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


प्राथमिक माहितीनुसार, धडकेनंतर गॅस टँकरला भीषण आग लागली. आग इतकी तीव्र होती की संपूर्ण वाहन काही क्षणांत ज्वाळांच्या विळख्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच पारोळा अग्निशमन दल, पोलीस, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन तसेच रुग्णवाहिका पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने सुमारे दोन तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सुदैवाने आग इतरत्र पसरली नाही आणि मोठी जीवितहानी टळली.


या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन ते तीन तास ठप्प झाली होती. आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.दरम्यान, ही संपूर्ण घटना सबगव्हाण टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधले जाणार आहे. प्राथमिक तपासात टँकरमधील चालक व क्लिनर यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, घटनेचा पुढील तपास पारोळा पोलीस करत आहेत. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!