Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमपुणे

बापरे बाप! हार्ट अटॅक, बीपी आणि डायबिटीज वरील औषधेच निघाली बनावट ; १.७२ कोटींचा औषधसाठा जप्त, कंपनीचा परवाना रद्द!

पुणे.मंडे टु मंडे न्युज. || हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक), उच्च रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (डायबिटीज) यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्येच आवश्यक औषधी घटक नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील ‘इंडयुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन’ या औषधनिर्मिती कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत कंपनीचा औषध उत्पादन परवाना रद्द केला आहे. या कारवाईमुळे औषधनिर्मिती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीने आवश्यक उत्पादन परवानगी न घेता तब्बल नऊ प्रकारच्या औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. सरकारी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या औषधांच्या तपासणीत यापैकी दोन औषधे पूर्णपणे बनावट असल्याचे आढळले, तर उर्वरित औषधे निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट झाले.

औषधांमध्ये मूळ घटकच गायब!
तपासणीदरम्यान ‘इबुकेअर प्लस’ (Ibucare Plus) या औषधामध्ये वेदनाशामक म्हणून वापरला जाणारा इबुप्रोफेन हा महत्त्वाचा घटक अजिबात आढळला नाही. तसेच ‘केअरव्हिटा-एम’ (Carevita-M) या मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांमध्ये लेबलवर नमूद केलेले कोणतेही औषधी घटक आढळले नाहीत. उर्वरित औषधांमध्येही गुणवत्ता मानकांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून, त्यात हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि पचनाच्या विकारांवरील औषधांचा समावेश असल्याची माहिती आहे.

१.७२ कोटींचा औषधसाठा जप्त
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन FDA प्रशासनाने पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयातून संबंधित कंपनीचा सुमारे १ कोटी ७२ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त केला आहे. सरकारी रुग्णालयाला पुरवठा झालेल्या औषधांच्या गुणवत्तेवरही यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तीन महिन्यांत दुसऱ्यांदा परवाना रद्द
FDA च्या पुणे विभागाने कंपनीचे ‘फॉर्म २५’ आणि ‘फॉर्म २८’ अंतर्गत असलेले औषध उत्पादन परवाने तात्काळ प्रभावाने रद्द केले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत कंपनीचा परवाना रद्द होण्याची ही दुसरी वेळ असल्याचे समोर आले आहे. यापुढे कंपनीला औषधांचे उत्पादन, पॅकिंग, चाचणी आणि वितरण करता येणार नाही.

तुकाराम मुंढे यांचा कठोर कारवाईचा इशारा

या प्रकरणी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड करून किंवा आवश्यक परवानगीशिवाय उत्पादन करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही कंपनीची गय केली जाणार नाही. संबंधित कंपनीविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत न्यायालयीन खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे गंभीर आजारांशी झुंज देणारे रुग्ण औषधांवर विश्वास ठेवून उपचार घेत असताना, औषधांमध्येच आवश्यक घटक नसल्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे औषधनिर्मिती कंपन्यांच्या गुणवत्ता नियंत्रणावर आणि सरकारी यंत्रणांच्या तपासणी प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!