गुजरात मध्ये जळगावच्या एकाच कुटुंबातील सहा जणांना कालव्यात फेकले; आई – वडिलांसह तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता, १३ वर्षीय मुलगी बचावली
जळगाव. मंडे टु मंडे न्युज || रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील एका मजूर कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार जणांनी कुटुंबातील सहा सदस्यांना उकाई-काकरापार लेफ्ट बँक कालव्यात फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू झाला असून, दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. तर १३ वर्षीय मुलाने कालव्यातील पाईपचा आधार घेत आपला जीव वाचवला. या घटनेने जळगाव जिल्ह्यासह गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे.

रोजगाराच्या शोधात निघाले अन् काळाने गाठले
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. अधिक रोजगार मिळवण्याच्या उद्देशाने २१ नोव्हेंबर रोजी ते कुटुंबीयांसह चारचाकी वाहनाने गुजरातमधील सुरतकडे रवाना झाले होते. मात्र, उवा गावाजवळ त्यांच्या वाहनाला दुसऱ्या कारमधून आलेल्या चौघांनी अडवले.
आरोपींनी पाटील कुटुंबाचे वाहन अडवून त्यातील सदस्यांना जबरदस्तीने बाहेर काढले आणि जवळच्या उकाई-काकरापार लेफ्ट बँक कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. हा प्रकार केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

१३ वर्षीय मुलाने पाईप पकडून वाचवला जीव
या घटनेत कुटुंबातील १३ वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत मृत्यूच्या दाढेतून स्वतःची सुटका करून घेतली. कालव्यात पडताच त्याने पाण्यातील एका पाईपला घट्ट पकडले. त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्यापासून बचावला.
काही वेळाने कालव्याबाहेर आल्यानंतर तो जवळच्या हॉटेलमध्ये पोहोचला. तेथील कर्मचाऱ्यांना त्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
कालव्यात आढळले तिघांचे मृतदेह
घटनेची माहिती मिळताच बारडोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. या शोधमोहिमेदरम्यान महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरात कालव्यात तीन जणांचे मृतदेह आढळून आले.
मृतांमध्ये नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील आणि त्यांच्या पत्नी कविता पाटील यांच्यासह कुटुंबातील एका तरुणीचा समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रथमेश आणि हरीशचा शोध सुरू
या घटनेतून १३ वर्षीय मुलगा बचावला असला, तरी प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून कालवा तसेच आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.
दोन्ही मुलांचा शोध लागावा यासाठी कालव्याच्या पाण्यात आणि संभाव्य ठिकाणी तपास सुरू आहे.

चार संशयितांविरोधात गुन्हा; ६० पोलिसांचा सहभाग
या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी हत्येच्या अनुषंगाने तपास सुरू केला असून, हल्ल्यामागील कारण, आरोपींचे कुटुंबाशी असलेले संबंध आणि हा प्रकार पूर्वनियोजित होता का, याचा शोध घेतला जात आहे.
सुरत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी तपासाबाबत माहिती देताना आरोपींच्या शोधासाठी सुमारे ६० पोलिसांचा सहभाग असलेली विविध पथके कार्यरत असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखा (LCB), विशेष कार्य पथक (SOG), पॅरोल फर्लो पथक, डी स्टाफ, तांत्रिक पथक आणि डीवायएसपी पथक या तपासात सहभागी आहेत.
दरम्यान, जळगाव पोलिसांनीही सुरत ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आहे. दोन बेपत्ता मुलांचा शोध आणि संशयितांना अटक करण्यासाठी गुजरात पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडलेल्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे एरंडोल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.




