केळी पीक विम्याच्या पात्र शेतकऱ्यांना ठरवले अपात्र, पात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून बाद ; शेतकऱ्यांची यावल कृषी कार्यालयावर धडक
यावल. मंडे टु मंडे न्युज. || रब्बी हंगाम २०२५ मधील केळी पीक विम्यासाठी नियमानुसार विमा हप्ता भरूनही पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अचानक अपात्र ठरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १७ व १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत अनेक शेतकऱ्यांची नावे अपात्र यादीत समाविष्ट करण्यात आल्याने यावल तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी यावल येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
रब्बी २०२५ मधील केळी पीक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. त्यानंतर शासनाकडून नुकसानभरपाई देण्याबाबत निर्णय झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी या संदर्भातील याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक पात्र शेतकऱ्यांचे विमा दावे थेट नामंजूर करण्यात आल्याचे समोर आले.
अचानक अपात्र ठरविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपले दावे नेमके कोणत्या कारणामुळे नाकारण्यात आले, याची विचारणा करण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी संबंधित प्रकाराबाबत जाब विचारला; मात्र कृषी कार्यालयाकडूनही त्यांचे समाधानकारक निरसन झाले नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
रक्कम भरूनही नुकसानभरपाईपासून वंचित!
नियमानुसार केळी पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसेल, तर विमा योजनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची शासनाने तसेच संबंधित विमा कंपनीने गांभीर्याने दखल घ्यावी. अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या दाव्यांची फेरतपासणी करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी जोरदार मागणी यावल तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.


