मोठी बातमी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाद दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! “नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत
• मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं
• भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं..
• प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं..
• महाराष्ट्रातील सर्व १२,००० ग्रंथालयांना सशक्त करणं..
,• मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं..
केंद्र सरकारने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील. विशेषत: सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणं, या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजिटायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे महाराष्ट्र (मराठी), बिहार, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश (पाली आणि प्राकृत), पश्चिम बंगाल (बंगाली), आसाम (आसामी) या राज्यांवर या निर्णयाचा प्रभाव पडेल.
अभिजात दर्जा मिळणे म्हणजे नेमाक काय?
देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात
१) भाषेचे साहित्ये हे किमान १५००-२००० वर्षे प्राचीन असावे लागते.
२) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
३) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
४) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.