राष्ट्रीयसामाजिक

शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात भव्य वाहन फेरी ; देशभरातील हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग!

वाहनफेरी म्हणजे भक्तीची दिव्य वारी ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

फोंडा (गोवा) मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | उद्यापासून फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या जनजागृतीसाठी आज एक ऐतिहासिक आणि भव्य वाहनफेरी काढण्यात आली. ही वाहनफेरी फोंडा येथील सनातन आश्रमापासून फर्मागुडीपर्यंत निघाली, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपर्‍यातून महोत्सवासाठी येणारी शेकडो वाहने पत्रादेवी, काणकोण इत्यादी सीमारेषांद्वारे गोव्यात प्रवेश करून सुसज्ज फेरीचा भाग बनली. दुचाकी, चारचाकी आणि बस गाड्यांवर फडकणारे भगवे ध्वज, तसेच मुखात घुमणारे ‘हर हर महादेव’, ‘सनातन धर्माचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’ अशा घोषणांनी संपूर्ण गोवा भगवेमय झाला! या तेजस्वी जयघोषांनी केवळ रस्तेच नव्हे, तर जनमानसही भारले गेले. सर्वत्र एकच स्फुरण निर्माण झाला ‘सनातन राष्ट्राचा शंखनाद’! ही फेरी म्हणजे सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी हिंदु राष्ट्राच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल होय!

सनातन संस्थेच्या फोंडा येथील सनातन आश्रमाजवळ माजी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (IAS) श्री. अरुण देसाई यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन केल्यानंतर वाहनफेरीला प्रारंभ झाला. ही वाहनफेरी पुढे कवळे -तिस्क फोंडा, शांतीनगर जंक्शन, गोवा बागायतदार, फोंडा पोस्ट ऑफीस कार्यलय-फोंडा येथील जुने बसस्थानक-श्री हनुमान मंदिर, कुर्टी-फर्मागुडी येथील किल्ल्याजवळ सांगता झाली. यापूर्वी विविध ठिकाणी सुहासिनींनी धर्मध्वजाची ओवाळणी करून आणि रस्त्यावर रांगोळी घालून फेरीचे स्वागत केले. या वेळी विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

वाहनफेरी म्हणजे भक्तीची दिव्य वारी ! – अभय वर्तक, प्रवक्ता सनातन संस्था वाहन फेरीच्या प्रारंभी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘ज्याप्रकारे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे प्रयाण करतात. त्याचप्रकारे सनातन धर्मासाठी विश्वव्यापक कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवासाठी देशविदेशातून हजारो साधक आणि धर्मप्रेमी हिंदू विविध मार्गाने आज गोव्यातील पंढरीत प्रवेश केला. ही केवळ वाहन फेरी नसून श्रीगुरुदेवांप्रती असलेल्या भक्तीची दिव्य वारी आहे. पत्रकार, पोलीस आदींनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा महोत्सव आहे.’’ या महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी, तसेच थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट द्या !

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!