नशिराबाद मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज खांब वाकले, वीजपुरवठा खंडित
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शहरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. खंडेराव मंदिरासमोर, सिद्धार्थ नगर परिसरात नशिराबाद शहराला वीजपुरवठा करणारे ११ केव्हीचे दोन वीजखांब वाकल्याची घटना घडली.
या घटनेमुळे वीजतारा तुटून शहरातील काही भागातील वीजपुरवठा रात्रीपासून खंडित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तसेच सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले.
सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांनी सांगितले की, वाकलेले वीजखांब उभारण्याचे आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू असून लवकरात लवकर सेवा सुरळीत करण्यात येईल.दरम्यान, नागरिकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
