जळगावयावलसामाजिक

मंदिरांत हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळणे आवश्यक ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

यावल येथील जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’स उत्तम प्रतिसाद

यावल, जि. जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | २८ मार्च. मंदिरांत हिंदूंना सनातन हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे केले. मनुदेवी, यावल (जिल्हा जळगाव) येथे २७ मार्चला पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’त ते बोलत होते. या वेळीप्रसंगी माजी सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, माजी संपादक श्री. दिलीप तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.


श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘काही मंदिरांमध्ये चालणारे अपप्रकार आपण रोखले पाहिजे. उदाहरणार्थ एका मंदिरात ख्रिसमसच्या वेळेला देवतेच्या मूर्तीला सांताक्लॉजचा पेहराव केला होता. दुसर्‍या एका मंदिरात एका कार्यक्रमाच्या वेळी संबंधित देवतेसमोर केक आणून तो कापला. असे प्रकार धर्मविरोधी आहेत. खरे तर मंदिरे ही सनातन हिंदु संस्कृतीचे शिक्षण देणारी केंद्रे आहेत. त्यामुळे आपणच अशा अपप्रकारांना थारा देता कामा नये. देशात वक्फ बोर्डाने मोठ्या प्रमाणात भूमींवर अतिक्रमण केलेले आहे. महाराष्ट्रातसुद्धा अनेक देवस्थानांच्या भूमी वक्फ बोर्डाने अतिक्रमित केलेल्या आहेत. त्यामुळे या भूमी वक्फ बोर्डाकडून परत घेणे आणि त्यासाठी संघटितपणे कायदेशीर लढा देणे, ही काळाची आवश्यकता आहे. देवस्थानाच्या इंच इंच भूमी परत मिळवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ महाराष्ट्रात जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन मंदिर विश्वस्तांचे प्रभावी संघटन करत आहे.’’

मंदिरांमध्ये नियमांनुसार सर्व व्यवहारांच्या पारदर्शकपणे नोंदी ठेवणे आवश्यक ! - दिलीप देशमुख, माजी सहधर्मदायआयुक्तमंदिरांमध्ये नियमांनुसार सर्व व्यवहारांच्या पारदर्शकपणे नोंदी ठेवणे (रेकॉर्ड कीपिंग) अत्यंत आवश्यक आहे. कुणालाही मंदिराच्या कुठल्याही व्यवहाराकडे बोट दाखवण्याची संधी मिळणार नाही, अशा पद्धतीने सर्व व्यवहाराच्या नोंदी आपण ठेवायला हव्यात.

देवतांना न मानणार्‍यांचा डोळा मंदिरांत येणार्‍या भाविकांच्या पैशांवर !- दिलीप तिवारी, माजी संपादक
मी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये दर्शनाला गेलो असता तेथे बाहेरच्या भागात असणारी जवळपास ९० टक्क्यांहून अधिक दुकाने अहिंदूंची असल्याचे मला दिसून आले. जे आपल्या देवतांना मानत नाहीत, ते लोक मंदिरांत येणार्‍या भाविकांच्या पैशांवर मात्र लक्ष ठेवून असतात. या माध्यमातून ते हिंदूंकडून कोट्यवधी रुपये कमावतात. हे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी आपणच जागृत होऊन हिंदु दुकानदारांकडूनच शुद्ध आणि पवित्र असे साहित्य घ्यायला हवे. यासाठी संघटितपणे उपाययोजना आखायला हवी.


यासह या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी ‘भक्तांना मंदिरांशी जोडणे’, तसेच ‘सामूहिक आरती’ या विषयांवर, तर सनातन संस्थेचे श्री. वसंत पाटील यांनी ‘मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे कशी करावीत ?’, या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. श्री नीळकंठ चौधरी यांनी मंदिर महासंघाच्या कार्याचा आढावा मांडला.


या अधिवेशनाचा आरंभ वे.मू. अथर्व बयाणी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणाने झाला. या वेळी शंखनाद हिंदुत्वनिष्ठ श्री. कमलेश शिर्के यांनी केला. या अधिवेशनाचे प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे, सूत्रसंचालन रणरागिणी, हिंदु जनजागृती समितीच्या कु. धनश्री दहिवदकर, तर आभारप्रदर्शन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा संघटक श्री. यशवंत चौधरी यांनी केले. या अधिवेशनास जळगावमधील विविध मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते असे १५० हून अधिक जण उपस्थित होते. अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखिल कदम यांनी मंदिरांच्या संदर्भात मांडलेल्या विविध ठरावांना उपस्थितांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात अनुमोदन दिले.

मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी विश्वस्तांकडून शिबिराची मागणी !
प्रश्नोत्तराच्या सत्रात अधिवेशनाला उपस्थित मंदिरांच्या विश्वस्तांनी विविध समस्या मांडल्या. यामध्ये शासकीय निधी मंदिरांच्या ‘क’ आणि ‘ब’ वर्ग या गटांमध्ये नोंद होण्याच्या समस्येपासून ते ग्रामपंचायत नगरपरिषद, तसेच वन विभाग, पुरातत्व विभाग यांच्याकडून येणार्‍या समस्यांपर्यंत, असे अनेक प्रश्न विचारले. त्याविषयी श्री. दिलीप देशमुख यांनी अत्यंत समर्पक उत्तरे दिली. या वेळी मंदिरांच्या विश्वस्तांसाठी एक प्रशिक्षण शिबिर घेण्यात यावे, अशीही मागणी उपस्थित मंदिर विश्वस्तांनी केली.

उपस्थित मान्यवर प.पू. नारायण स्वामी, श्री रामेश्वर मंदिर, जळगाव. श्री नयन स्वामी, स्वामी नारायण मंदिर, जळगाव
महंत कन्हैयादास, श्रीराममंदिर, अमोदा, यावल, जळगाव
अधिवक्ता भरत देशमुख, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिल. श्री. प्रभाकर सोनावणे, अध्यक्ष, श्री नागाई-जोगाई मंदिर, जळगाव .श्री. विजय जैन, विश्वस्त, कण्व ऋषि आश्रम, जळगाव. श्री. नरेंद्र नारखेडे, अध्यक्ष, श्रीराममंदिर फैजपूर, यावल, जळगाव. श्री. शांताराम पाटील, अध्यक्ष, श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, जळगाव

मंदिर महासंघाची जळगावमध्ये मुहुर्तमेढ; दोन वर्षांत राज्यभर विस्तार !
फेबु्रवारी २०२३ मध्ये जळगाव येथे पार पडलेल्या पहिल्या ‘मंदिर न्यास परिषदे’त महाराष्ट्र मंदिर महासंघाची मुहुर्तमेढ रोवली गेली होती. आता मंदिर महासंघाच्या कार्याचा संपूर्ण राज्यात विस्तार झाला असून महासंघाच्या माध्यमातून राज्यातील ८०० हून अधिक मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यासह संपूर्ण देशभरात १५ सहस्रांहून अधिक मंदिरांचे संघटन झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!