जळगावात भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; रावेर तालुक्यातील एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
जळगाव.मंडे टु मंडे न्युज |पाळधी ते तरसोद महामार्गावर सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीदरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील शांताराम केशव पाटील (वय ५८) यांचा मृत्यू झाला, तर कारमधील चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास असोदा ते ममुराबाद गावादरम्यान बायपासवर घडला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील ईश्वर महाजन यांची प्रकृती आजारपणामुळे खालावल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात येत होते. ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा रामचंद्र महाजन हे नातेवाईक शांताराम पाटील व निखील पाटील तसेच चालक जितेंद्र रामदास सोपारकर यांच्यासह कारने नाशिककडे निघाले होते.
जितेंद्र सोपारकर हे कार (एमएच ४८, पी ०७५५) चालवत होते. त्यांनी जळगाव शहरातून न जाता शहराबाहेरील बायपास मार्गाचा वापर केला. दरम्यान, महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे एकाच बाजूने दोन्ही दिशेची वाहतूक सुरू होती.
असोदा ते ममुराबाददरम्यान बायपासवरून कार जात असताना पाळधीकडून जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (एमएच ०५, डीके ५३१४) ने कारला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, कारमधील ईश्वर महाजन, रामचंद्र महाजन, निखील पाटील, शांताराम पाटील आणि चालक जितेंद्र सोपारकर हे जखमी झाले.
अपघातात रामचंद्र महाजन यांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. निखील पाटील यांच्या कपाळाला दुखापत झाली, तर शांताराम पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. चालक जितेंद्र सोपारकर यांच्या छातीला दुखापत झाली. महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
जखमींवर उपचार सुरू असताना शांताराम पाटील यांचा काही वेळाने दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक व चालक सती अनंतराम ढिल्लो (रा. साकीनाका, मुंबई) याला ताब्यात घेतले. रामचंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


