भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

वैद्यकीय बिलासाठी २ हजारांची लाच घेताना पकडलेल्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील वरिष्ठ सहाय्यकाला कारावासाची शिक्षा

मंडे टु मंडे न्युज | शासनाकडून मंजूर झालेल्या वैद्यकीय बिलाची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर २ हजार रुपये स्वीकारणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील वरिष्ठ सहाय्यकाला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. रामचंद्र नरसु माकरे, वरिष्ठ सहाय्यक, वर्ग-३, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक असे शिक्षा झालेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.


प्रकरणानुसार, तक्रारदाराचे शासनाकडील मंजूर वैद्यकीय बिलाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी माकरे यांनी १६ सप्टेंबर २०१४ रोजी शासकीय पंचासमक्ष ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तडजोडीनंतर २ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर येथील वैद्यकीय खर्च प्रतिकृती कक्षासमोरील हॉलमध्ये २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माकरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.


या प्रकरणी सातपूर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा क्रमांक ३०६९/२०१४ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) प्रमाणे १६ सप्टेंबर २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पूर्ण झाल्यानंतर ९ एप्रिल २०१५ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची स्पेशल केस क्रमांक १९/२०१५ अशी होती.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित विनायक खारकर यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी रामचंद्र नरसु माकरे यांना दोषी ठरवत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत ६ महिने कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना कारावास भोगावा लागणार आहे. तसेच कलम १३(२) अंतर्गत एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


या प्रकरणातील कामकाज पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी आणि कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार प्रदिप काळोगे यांनी पाहिले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे व सचिन गोरवाडकर यांनी बाजू मांडली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!