संविधानाची मूल्ये, हक्क आणि कर्तव्यांबाबत जागरूकता निर्माण करणे हा संविधान दिनाचा मुख्य उद्देश : डॉ. जे. बी. अंजने
रावेर.मंडे टु मंडे न्युज || रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद करून हा दिवस साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. एस. ए. पाटील यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ संविधान दिन साजरा केला जातो, अशी माहिती दिली. डॉ. पी. आर. महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त २०१५ पासून भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागल्याचे सांगितले. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ असून संविधानातील मूल्ये, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये संविधानाची मूल्ये, हक्क आणि कर्तव्यांबाबत जागरूकता निर्माण करणे हाच संविधान दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले, तर आभार डॉ. जे. पी. नेहेते यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. हर्षल पाटील, श्री. श्रेयस पाटील आणि श्री. अनिकेत पाटील यांनी परिश्रम घेतले.





