भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावशैक्षणिक

शालार्थ घोटाळ्याच्या तपासाला वेग ; शाळांच्या १५ वर्षांतील तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ! जळगाव जिल्ह्यातील १३९ शाळांचा समावेश

जळगाव.मंडे टु मंडे न्युज ||  नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील संबंधित शाळांच्या मागील १५ वर्षांतील तपासणीची माहिती पोलिसांनी मागवली आहे. सन २०१० ते २०२५ या कालावधीत विविध शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीचा तपशील आणि तपासणी पूर्ण झाल्याचे अहवाल सादर करण्याबाबत नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित तालुक्यांतील शाळांची माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबत जोडलेल्या यादीतील शाळांबाबतची माहिती एकत्रित करून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले होते.

यात जळगाव जिल्ह्यातील १३९ शाळांचा समावेश असून त्यात जळगाव, पाचोरा भडगाव, अमळनेर, एरोन्डोल, रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव, जामनेर, पारोळा,
चोपडा, चाळीसगाव या तालुक्यातील शाळांचा समावेश आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीची माहिती मागवली?

नाशिक शहरातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या विशेष तपास पथकाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ९४ अन्वये पाठविलेल्या पत्रात संबंधित शाळांच्या तपासणीची माहिती मागितली आहे. यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक, शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीचा तपशील आणि तपासणीचा पूर्तता अहवाल यांचा समावेश आहे.

या माहितीद्वारे संबंधित शाळांमध्ये विविध अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासण्यांचा अभिलेख तपासासाठी उपलब्ध होणार आहे. पोलिसांनी संबंधित माहिती आणि अहवालासह २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक येथील कार्यालयात प्रतिनिधीसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्याचे पत्रात नमूद आहे.

नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ दाखल असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ६१(२) आणि ३(५), तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६, ६६(क) व ६६(ड) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे.

मुख्याध्यापकांनाही माहिती देण्याचे निर्देश

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने संबंधित यादीतील शाळांच्या मुख्याध्यापकांनाही त्यांच्या शाळेशी संबंधित माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यास सांगितले आहे. त्यामुळे संबंधित शाळांचे अभिलेख, पूर्वी झालेल्या तपासण्या आणि त्यावरील पूर्तता अहवाल संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.दरम्यान, या तपासणी अहवालांच्या आधारे पुढे कोणती माहिती समोर येते आणि तपासात कोणते निष्कर्ष निघतात, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!