भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल-चोपडा मार्गावर कार-दुचाकीची समोरासमोर धडक; यावल तालुक्यातील तिघे जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

यावल.मंडे टु मंडे न्युज || यावल-चोपडा मार्गावरील साकळी गावाजवळील साईराम जिनिंगसमोर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील तिघे जण जखमी झाले. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या अपघातात दोघांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

मनुदेवीकडे जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुमार हे कार (क्रमांक एमएच ०५ बीएल ४७४९) घेऊन यावलहून चोपड्याच्या दिशेने श्रीक्षेत्र मनुदेवी येथे जात होते. त्याचवेळी साकळी येथून यावलकडे दुचाकीने (क्रमांक एमपी ६८ झेडएफ १०३७) प्रवास करणारे प्रवीण किशोर तेली (वय २१), हर्षल राजेंद्र माळी (वय १७) आणि तय्यब राजू तडवी (वय १६, तिघेही रा. साकळी) यांच्या दुचाकीची कारशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघेही जखमी झाले.

पोलिसांकडून तातडीने मदत

अपघाताच्या वेळी शासकीय वाहनातून त्या मार्गाने जात असलेले यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, डॉ. शहादाब शेख तसेच कादर तडवी आणि भूषण गाजरे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. प्रवीण तेली आणि हर्षल माळी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, वाहतूक पोलीस कर्मचारी अर्षद गवळी आणि दिवाकर जोशी यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी संबंधित वाहने यावल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!