अखेर मेहुणबारे गुटका प्रकरणात एपीआय सह सात पोलीस कर्मचारी निलंबित
जळगाव (प्रतिनिधी)। चाळीसगावचे आमदर मंगेश चव्हाण यांनी, पोलिसांनी मेहुणबारे येथे पकडलेला गुटख्याचा ट्रक जळगाव येथे आणल्याचे प्रकरण उचलून धरल्याने पोलिसांना चांगलेच भोवले. याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी एपीआय सचिन बेंद्रे यांच्यासह सात पोलीसांना निलंबित केले आहे.
मेहुनबारे पोलिस स्थानकाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याने भरलेला ट्रक पकडला होता. परंतु स्थानिक ठिकाणी फिर्याद न देता तो ट्रक थेट जळगाव येथे आणला जात होता. याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्रभर ट्रकचा पाठलाग करत जळगाव शहरालगत सकाळी सुमारे चार वाजेच्या दरम्यान जैन व्हॅली जवळ तो ट्रक पकडला. यावेळी साधारण तासभर आमदार चव्हाण यांचा , मेहुनबारे पोलिसस्टेशन च्या हद्दीत ट्रक पकडला असता येथे गुन्हा दाखल न करता जळगाव येथे का नेला जात आहे या वरून पोलिसांसोबत वाद झाला होता यानंतर हा ट्रक जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण यांनी माझी फिर्याद घ्या असा आग्रह धरल्याने आमदार चव्हाण आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली.
आमदार चव्हाण यांनी यासंदर्भात संपूर्ण घटनाक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दिघावकर व पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंढे यांना दिली. यानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढत या प्रकरणात गुटखा ट्रक मालकांशी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप केला.या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये साधारण 67 लाखाचा गुटखा आढळून आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते चौकशी अंती अखेर काल रात्री पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांनी निलंबनाचे आदेश काढले. निलंबितामध्ये सपोनि सचिन बेंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे रामचंद्र बोरसे, नारायण पाटील, मनोज दुसाने ,महेश पाटील, प्रवीण हिवराळे, मुख्यालय चे नटवर जाधव , मेहुनबारे पोलिस स्टेशनचे रमेश पाटील या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.