भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

Video:जळगावची ‘ नाचे मयुरी’ मानसी नृत्यकलेत झेप घेणार…!!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। ज़िन्दगी बहुत हसीन है,
कभी हंसाती है, तो कभी रुलाती है, लेकिन जो ज़िन्दगी की भीड़ में खुश रहता है, ज़िन्दगी उसी के आगे सिर झुकाती है..! कलेला मरण नसते आणि कलेची कधीही किंमत होऊ शकत नाही ,कला ही अजरामर असते.. कला मग ती कोणतीही असो, ती एक सर्जनशील कृती असते…!

कलावंत नेहमीच नवनिर्मितीच्या ध्यासाने पछाडलेला असतो.. अशीच एक अत्यंत गुणी , मेहनती आणि प्रचंड जिद्दी नृत्य कलावंत मानसी हेमंत पाटील ..!! ती जळगावातील अयोध्यानगर ( यमुनानगर ) भागात वास्तव्यास आहे. तिच्या आयुष्यात खूप दुःख , अडीअडचणी आल्यात , त्यात गेल्या पाच वर्षांपूर्वी ती एका खासगी कोचिंग क्लासला सायकलवर जात असताना 18 चाके असलेल्या मोठ्या कंटेनरचा कट लागल्याने ती राष्ट्रीय महामार्गावर आदळली आणि तिच्या उजच्या पायावरून चाके गेली ,त्या पायाचा चक्काचूर झाला..मात्र नशीब बलवत्तर म्हणून ती बालंबाल बचावली …तिला मात्र पाय कायमचा गमवावा लागला , हे दुःख मानसीला कायम सलत राहील..एक मोठा आघातच तिच्यावर कोसळला..ही घटना घडली तेव्हा ती दहावीत होती.जळगावच्या समर्थ अँक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये ती ऍडमिट झाली , अनेक दिवस तिच्यावर उपचार करण्यात आलेत..ती त्या धक्क्यातून सावरली , अतिशय वेदनादायक तिचे पुढील दिवस, शब्दात व्यक्त करणेही कठीणच..!! कुटुंब सावरले, वडील हेमंत पाटील (शेळगावकर) आधीच हातमजुरी करून बेजार होत असतानाच मुलीचा एक पाय गमवावा लागल्याचे शल्य त्यांना व मानसीच्या आई ( सौ.जयश्री ) यांना सतत बोचते आहे. भावाने ( पुष्कर ) याने कसेबसे शिक्षण घेतले आणि तो आता पुणे येथे जॉब करतोय. मानसीच्या आईचे माहेर हे पाडळसे येथील आहे. अल्पभूधारक शेतकरी दामोदर भगवान बोरोले यांच्या त्या कन्या होत. मानसीला दोन काका, एक राजेंद्र पाटील ..ते खान्देश मिलमध्ये नोकरीला होते, मिल बंदमुळे त्यांच्यावरही वाईट परिस्थिती उदभवलीय..! तर लहान काका देविदास निवृत्ती पाटील …त्यांची मेस आहे .’ दुष्काळात तेरावा महिना ‘ अशी त्यांची एकंदर हलाखीची परिस्थिती आहे. शेळगावकर असणारे हे पाटील कुटुंब..!! पूज्य ह.भ.प. वैकुंठवासी गादीपती राजाराम शास्त्री महाराज , प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दीपक महाराज , ह.भ.प. सूर्यभान महाराज हे देखील शेळगावचेच..! वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समाजात प्रबोधन करणारं हे गाव …तापीतीरी वसलेलं आहे. तापी आणि वाघूर नदीचा संगम तिथे आहे.

मानसी पाटील हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगावच्या का.ऊ.कोल्हे विद्यालयात झाले. त्यानंतर अकरा व बारावीचे शिक्षण डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात तर बी.कॉम पर्यन्तचे धनाजी नाना महाविद्यालयात पूर्ण केले , जळगाव येथील शिरसोली रोडवरील गुलाबराव देवकर कॉलेजमध्ये ती एमबीएचे शिक्षण घेत आहे. मानसीत प्रचंड आत्मविश्वास भरलेला आहे. ती म्हणते, ” एमबीए (फायनान्स) झाल्यानंतरसुद्धा मी फक्त आणि फक्त नृत्य या कलेतच करियर करणार असून त्यासाठी माझी मेहनत सुरू आहे. नृत्यगुरु योगेश मर्दाने यांच्याकडे मी धडे गिरवीत आहे .बॉलीवूड आणि कंटेंम्पररी डान्स प्रकार मी शिकत आहे. देशाची नव नृत्य संस्कृती दाखवित असताना अंगविक्षेप न करता या कलेची आराधना करण्यावर माझा भर राहील. हवी फक्त कलाप्रेमी , सेवाभावी आणि मदतीचा हात पुढे करणाऱ्या व्यक्तिमत्वांची साथ “…! प्रत्येकाकडे काही न काही कला ही अवगत असते.त्यातल्या त्यात संगीत व नृत्यकला या औरच..!! नृत्य ही नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.. दृक… श्राव्य अशा दोन्ही अंगाची लय साधणारी कला म्हणजे नृत्य ही एकमेव कला होय..मग नृत्य हे पाश्चात्य असो की शास्त्रीय … !! विविध भाव नृत्यात प्रकट होतच असतात.नृत्य मनाला आनंद देत असते.

काहीतरी उत्तुंग करण्याचा ध्यास मानसीने घेतलाय. नृत्यात वेगवेगळे कम्पोजिंग तिचे सुरू आहेत.
मानसीने जयपूर फूटचाही काही दिवस वापर केला मात्र जखम होऊ लागल्याने आणि खूप जड असल्याने तिने वापरणे बंद केले..मनात न्यूनगंड न बाळगता केवळ जिद्द , हिंमत आणि चिकाटीच्या जोरावर मी विविध संघर्षाचे वादळ आणि समस्यांना तोंड देईल आणि माझा कलेचा प्रवास सुरु ठेवेल , जळगावचे ,माझ्या कुटुंबाचे नाव उंचावेल अशी आशा मानसीने बोलताना व्यक्त केलीय. एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई , लोक सल्ला देतात पण हवी तितकी साथ नाही , असे अनेक उदाहरणे जगासमोर आहेत. हताश न होता कर्तृत्वानेच आकाश जिंकायचे आहे. लिखाणाचीही तिला आवड असून काही न काही लिखाण ती करत असते. निखालस मन असलेली ही नृत्यांगना आहे .जगण्यातले स्वच्छ भाव , आणि निरागसता हे तिच्याकडे पाहिले की पटते.ती म्हणते , मला हवे फक्त प्रेक्षकांकडून अँप्रिसीएशन..!!
कलाकार हा वाहवा , शाबासकी आणि कौतुकाची मिळणारी थाप याचाच भुकेला असतो. ‘ भविष्यात मला गरीब कलावंतांसाठी काहीतरी करायचे आहे , ते स्वप्न मला पूर्ण करण्यासाठी साथ हवी आहे ‘ , असे तिने बोलून दाखवले. कुटुंबाचे जगणं सुखकर करण्यासाठी प्रचंड धावपळ सुरू…एकीकडे हमाली काम तर दुसरीकडे संघर्ष , अशा गोष्टींवर समर्थपणे मात करण्याचा प्रांजळपणे प्रयत्न सुरू आहे.
‘ जगावं की मरावं ‘ असा विचारही आमच्या मनात डोकावून जात असतो , पण मन जर खंबीर असेल तर निश्चितच मार्ग सापडतो , या आशेवर आम्ही जीवन जगतोय अशा भावना चिंताग्रस्त चेहऱ्याने मानसीची आई सौ.जयश्री पाटील यांनी व्यक्त केल्यात .
त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण व्हावं यासाठी चाललेली त्यांची धडपड ही वाखाणण्याजोगीच आहे.मानसीला आपण सर्वांनी मिळून साथ देऊ या. ! तिला नृत्यकलेत उत्तुंग शिखर गाठण्यासाठी सहकार्य दाखवू या , शुभेच्छांचे आणि आशीर्वादाचे बळ तिच्यासोबत असू द्या हीच अपेक्षा. !!

आजचे हे तिचे छोटेसे यश उद्या मोठी झेप निश्चितच घेईल यात शंकाच नाही..
” मुश्किलों से भाग जाना आसान होता है..
हर पहलू जिन्दगी का इम्तिहान होता है…
डरने वाले को मिलता नहीं कुछ जिंदगी में
लड़ने वालो के कदमों में जहान होता है..!!
तुषार वाघुळदे जळगाव

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!