भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

अनैतिक संबंधांच्या वादातून मजुराची गळा आवळून हत्या; रावेर पोलिसांकडून अवघ्या दोन दिवसांत खुनाचा उलगडा

रावेर, मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात कपाशीच्या शेतात आढळलेल्या ३० वर्षीय मजुराच्या हत्येचा उलगडा रावेर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत केला आहे. मयताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या वादातून दोन जणांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कुरबान शेख शब्बीर (वय ३०) हा ९ जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह ११ जुलै रोजी सकाळी नांदूरखेडा शिवारातील कपाशीच्या शेतात आढळून आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.


तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर येथे दोघांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून गणेश घोरपडे याने मयताला, “आमच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप केलास तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तपासात उघड झाले.


९ जुलैच्या रात्री गणेश घोरपडे आणि मेघराज वसंत सांगळे यांनी शेख कुरबान याला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे हाताने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कपाशीच्या शेतात टाकून दोघेही पसार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी मयताचा भाऊ शेख सलमान शेख शब्बीर (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


या गुन्ह्यात मेघराज वसंत सांगळे याला अटक करण्यात आली असून मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याला मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील सागवानी (तहसील जयशिनगर) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगवान आणि तांत्रिक तपास करून खुनाचे गूढ उकलले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!