वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला, महिला जागीच ठार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शेतात काम करत असलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात गिरणा धरणाजवळ आज ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली.बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली इंदुबाई वसंत पाटील ही वृद्ध महिला मात्र जागीच ठार झाली.
इंदुबाई वसंत पाटील. वय ७३ वर्ष. रा.देवगाव ही वृद्ध महिला
सोमवार दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक तिच्यावर बिबट्याने हल्ला केला. तिच्या डोक्यावर व तोंडावर बिबट्याने जोरदार चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. शेतात आजू बाजूला मदतीसाठी कोणीच नसल्याने त्या त्याच अवस्थेत शेतात पडून होत्या.
शेतात काम करणाऱ्या बाळू पुना पाटील आणि रमेश पौलाद सोनवणे यांना ही घटना लक्षात येताच, त्यांनी तात्काळ पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बिबट्याचे पावलांचे ठसे आढळून आले आहे. लागलीच त्यांनी पोलिसांना आणि वनविभागाला याबाबत कळविले. इंदुबाई पाटील या त्या वेळी जखमी अवस्थेत पडून होत्या.
माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी नितीन बोरकर व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ इंदुबाई पाटील यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे
या घटनेमुळे देवगावसह जळगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून इंदुबाई पाटील त्यांच्या पश्चात रवींद्र व चंद्रकांत अशी दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

