ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार व ओबीसी आरक्षणानुसारच
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात सध्या सर्वच पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां संदर्भात मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही ११ मार्च २०२२ च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी, अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. ही निवडणूक सुद्धा नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने अधिसूचित केले होते. त्यामुळे हे पुन्हा स्पष्ट झाले आहे की, आजच्या आदेशाप्रमाणे नवीन वॉर्ड/प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील.
आज सुप्रीम कोर्टाने आणखी एक याचिका फेटाळून लावली. त्यात ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की, आमच्या ६ मे २०२५ च्या आदेशानुसार २७% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील. सुप्रीम कोर्टाने आज स्पष्टपणे सांगितले की, वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे. तसा कायदाही राज्य विधिमंडळाने केला आहे. म्हणून हा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारचा आहे.

