शरद पवारांचे व माझे फोनही टॅप झाले, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई :वृत्तसंस्था। शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी फोन टॅपिंग प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. माझ्यासोबत शरद पवार यांचे फोन टॅप करण्यात येत होते. तसंच फोन टॅपिंग फक्त आमदार, नेत्यांचेच नव्हे तर खासदार आणि पत्रकारांचेही करण्यात आले, असा दावा संजय राऊत यांनी केली. केंद्र सरकार आता सगळ्यांचेच फोन टॅप करत आहे मला हे माहिती आहे, असं देखील राऊत म्हणाले.
राज्यात फोन टॅपिंगवरुन राजकीय वादंग सुरु आहे. फोन टॅपिंगमध्ये केंद्रस्थानी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. राजेंद्र यड्रावकरांसह अनेक आमदारांसोबत रश्मी शुक्ला संपर्कात होत्या. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून रश्मी शुक्ला यांनी अनेक आमदारांना धमक्या दिल्या होत्या, असा आरोप राऊत यांनी केला. दरम्यान, संजय राऊत यांनी प्रशासनातील कुणावर विश्वास ठेवू नये, असा सल्ला दिला. सरकारमधील मंत्र्यांनी गांभीर्य ओळखून चौकशी लावायला हवी, असं देखील राऊत म्हणाले. यड्रावकर यांनी केलेला गौप्यस्फोट नाही कारण हे सर्वांना माहिती होतं. यड्रावकर किंवा इतर आमदारांशी रश्मी शुक्ला स्वत: संपर्क करुन नव्याने निर्माण होणाऱ्या ठाकरे सरकारसोबत जाऊ नका, भाजप सरकारसोबत जा. तुमच्या सर्वांच्या फाईली तयार आहेत अशा धमक्या दिल्या जात होत्या. हे सर्वांना माहिती होतं. तरीही त्या महिला अधिकारी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुढील पाच ते सहा महिने त्याच पदावर होत्या याचं आश्चर्य वाटतं, असं राऊत म्हणाले.
राजकारणात एवढा विश्वास कोणावर ठेवू नये. हात पोळले असताना असे दोन ते तीन अधिकारी आमच्या नजरेत आले होते. सरकार स्थापन होत असताना अशा अधिकाऱ्यांना जवळ ठेवू नये अशी शरद पवारांचीही भूमिका होती. तसं केलं असतं तर जे कागद घेऊन विरोधी पक्षनेते दिल्लीला आले होते ती संधी त्यांना मिळाली नसती. यामधून शहाणपण घेतलं असेल असं समजूयात, असं संजय राऊत म्हणाले.