या महापालिकेत नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर; भाजपला सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (अक्षय साळवे)। नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार वसंत गिते व सुनील बागूल यांनी भाजपचा त्याग करून स्वगृही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील किमान दीड डझन नगरसेवकांना पक्षात टिकवून ठेवण्याचे आव्हान भाजपला पेलावे लागणार आहे. नगरसेवक दिनकर पाटील व स्थायी समितीचे माजी सभापती रणजित नगरकर या भाजपच्या आणखी दोघांचीही पावले शिवसेनेकडे वळली असल्याने शहर भाजपला भगदाड पडण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गिते व बागूल यांचे समर्थक, अनेक आजी- माजी नगरसेवक व भाजपबरोबरच मनसेत असलेल्या या दोघांच्या समर्थकांच्या भूमिकेबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. नववर्षात शिवसेनेला बळ देणाऱ्या या घटनेमुळे आनंदाची लहर असली तरी नव्यांच्या आगमनाबरोबरच पूर्वीच्या गटबाजीलाही नवी धार येण्याच्या शक्यतेने तेथेही काहीशी अस्वस्थता आहे.
गिते शिवसेनेचे पहिले महापौर राहिलेले आहेत, तर बागूल जिल्हाप्रमुख म्हणून पूर्वी शिवसेनेत होते. गितेंनी मनसेच्या स्थापनेवेळी पक्षत्याग केला होता. नंतर ते भाजपमध्ये गेले, तर बागूल प्रथम राष्ट्रवादीत व नंतर भाजपमध्ये गेले होते. गितेंचे पुत्र प्रथमेश यांनी भाजप सत्तेच्या पहिल्या पर्वात उपमहापौरपद भूषविले, तर दुसऱ्या टप्प्यात बागूल यांच्या मातोश्री भिकूबाई सध्या उपमहापौरपदी आहेत. या शोभेच्या पदांना काही अर्थ नसल्याची दोघांचीही भावना होती. त्यातच सुरुवातीला प्रदेश कार्यकारिणावर त्यांना चांगली पदे दिली गेली, परंतु नंतर त्यांची पदावनती केली गेली, शिवाय पक्षात उपरेपणाची वागणूक मिळत राहिली. गितेंना आमदार देवयानी फरांदे यांच्याशी पक्षात निकराचा संघर्ष करावा लागला. या सर्व प्रकाराला वैतागलेल्या गितेंनी गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय मित्रमंडळींसमवेत मिसळ पार्टीचे आयोजन करून भाजप सोडण्याचा आपला इरादा चाचपडून पाहिला होता. अडीच वर्षांपूर्वी इतर पक्षांतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती झालेले अनेक कार्यकर्ते या निमित्ताने फेरविचार करण्याची शक्यता दिसत आहे. गिते व बागूल या दोघांनाही व्यापक जनाधार असल्याने शिवसेनेला संपूर्ण जिल्ह्यात राजकीय लाभ मिळण्याची शक्यता आहे.
माजी उपमहापौर नगरसेवक प्रथमेश गिते व विद्यमान उपमहापौर भिकूबाई बागूल यांच्या पदांचे या नव्या राजकीय समीकरणात काय होणार, याकडे आता लक्ष लागले आहे. तांत्रिकदृष्ट्या पक्ष सोडणे त्यांना शक्य होणार नसल्याने ते पदत्याग करून पदावर पाणी सोडतात की भाजपमधील उर्वरित कालावधी पूर्ण करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.