महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे लाचखोर क्षेत्र अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी एसीबी च्या ताब्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव येथे कार्यरत असलेले क्षेत्र अधिकारी (वर्ग-०२) राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२) यांना आणि त्यांचे साथीदार खाजगी इसम मनोज बापु गजरे यांना १५,००० रुपयांच्या लाच प्रकरणी रंगेहात पकडण्यात आले आहे.
तक्रारदार हे रावेर येथील एका हॉस्पिटलमध्ये मॅनेजर या पदावर काम करीत असुन त्यांच्या हॉस्पिटलचे मालक यांनी दि. १६/०३/२०२५ रोजी हॉस्पीटलच्या बायोवेस्ट संबंधीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जळगांव येथे अर्ज केला असता सदर अर्जात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव येथे कार्यरत असलेले क्षेत्र अधिकारी (वर्ग-०२) राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२)
यांनी अर्जात त्रुटी काढल्या होत्या. त्यांनतर त्यांनी सदर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, नाशिक कार्यालयात अर्ज करून सदरचे प्रमाणपत्र २८/०८/२०२५ रोजी प्राप्त केले आहे.
त्या नंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जळगाव कार्यालयात केलेला अर्ज काढून घेण्यासाठी तक्रारदार हे दि. ११/०९/२५ रोजी कार्यालयात गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जळगाव कार्यालयातील श्री. सुर्यवंशी यांची भेट घेतली असता नमुद प्रमाणपत्र मिळण्याकरीता केलेला अर्ज रिजेक्ट करण्याकरीता १५,०००/- रूपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. २३/०९/२०२५ रोजी लाप्रवि, जळगाव येथे लेखी तक्रार दिली. त्याप्रमाणे प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, श्री. राजेंद्र सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांच्याकडे १५,०००/- लाचेची मागणी करून, मनोज बापु गजरे (खाजगी इसम) यांना देण्यास सांगितले.
त्याप्रमाणे दिनांक २४/०९/२०२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान श्री. राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांना मागणी केल्याप्रमाणे १५,०००/-रू. लाच रक्कम मनोज बापु गजरे, खाजगी इसम यांनी फोन पे द्वारे स्वीकारली, यात मनोज गजरे हा फरार असून श्री. राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी, वय ४२ वर्षे, क्षेत्र अधिकारी, वर्ग-०२, रा. फलॅट नं. ०५. बिल्डींग नं. १५, नवआकाश सोसायटी, धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक. याना ताब्यात घेऊन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान सदर आरोपी क्षेत्र अधिकारी श्री. राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी त्याच्या हँडबॅग मध्ये २,२६,०००/- रुपये रोख रक्कम देखील मिळून आली आहे. सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी श्री. योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, श्री. हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक, पोना/बाळ मराठे, ४) पोशिभूषण पाटील. आदींनी केली.

