आमोदा शिवारातून केळीचे घड चोरी प्रकरणी फरार मुख्य आरोपी रोकड रकमेसह जेरबंद
फैजपूर.मंडे टु मंडे न्युज |यावल तालुक्यातील आमोदा शिवारातील शेतातून हजारो रुपये किमतीचे केळीचे घड चोरी करून नेल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात फैजपूर पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि बँक व्यवहारांच्या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. अटकेतील मुख्य आरोपीकडून चोरीच्या केळीच्या विक्रीतून मिळालेली १५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
फैजपूर येथील त्रिमूर्ती चौकातील रहिवासी जितेंद्र दिनकर कोल्हे (वय ४५) यांची आमोदा गावाच्या शिवारातील गट क्रमांक २०५ मध्ये नफ्याने घेतलेली केळीची बाग आहे. या बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपये किमतीचे १५ क्विंटल वजनाचे ७० ते ८० केळीचे घड चोरून नेले होते. याप्रकरणी कोल्हे यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार मोती पराग पवार करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच संशयितांच्या बँक व्यवहारांचीही माहिती घेतली. या तांत्रिक तपासातून लहु अशोक केदारे, अजय सुनील केदारे, शुभम विजय केदारे आणि सुरज मिलिंद मोरे (सर्व रा. लुंबिनीनगर, बामणोद, ता. यावल) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हा घडल्यापासून मुख्य आरोपी लहु अशोक केदारे हा पोलिसांना चकवा देत फरार होता. त्याच्या शोधासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
दरम्यान, लहु केदारे हा फैजपूर शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला फैजपूर शहरातून ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. तसेच चोरीच्या केळीच्या विक्रीतून मिळालेल्या त्याच्या हिश्श्याची १५ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी, सहाय्यक फौजदार मोती पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल महाजन यांच्या पथकाने केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

