भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

पिंप्री अकराऊतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय गायब?कागदोपत्री बांधकाम दाखवून शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप ; चौकशीची मागणी

मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके |तालुक्यातील पिंप्री अकराऊत ग्रामपंचायतीअंतर्गत शासनाकडून मंजूर करण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सध्या प्रत्यक्ष जागेवर अस्तित्वात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदोपत्री बांधकाम दाखवून शासकीय निधीचा अपहार झाल्याची शक्यता व्यक्त करत ग्रामस्थ विजय प्रल्हाद गवळी यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून तत्काळ चौकशीची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, पिंप्री अकराऊत ग्रामपंचायतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय मंजूर झाले होते. तत्कालीन ग्रामसेवक सचिन यादव पाटील आणि सरपंच अशोक मांगीलाल सोनवणे यांच्या कार्यकाळात मजुरांच्या माध्यमातून वाचनालयाचे बांधकाम करण्यात आल्याचे कागदोपत्री नमूद असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.


मात्र, सद्यस्थितीत गावात वाचनालयाची इमारत प्रत्यक्षात कुठेही दिसून येत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच वाचनालयासाठी आणण्यात आलेले बांधकाम साहित्य अथवा इतर साहित्य कोठे वापरण्यात आले किंवा ते कुठे ठेवण्यात आले आहे, याची माहिती ग्रामस्थांना नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कागदोपत्री काम आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करण्याची मागणी
वाचनालयाचे बांधकाम प्रत्यक्षात झाले आहे की नाही, त्यासाठी मंजूर झालेला निधी किती होता, निधीचा वापर कशाप्रकारे करण्यात आला तसेच बांधकाम साहित्याची नोंद व प्रत्यक्ष उपलब्धता याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.

वाचनालयाचे साहित्य चोरीस गेले असल्यास तसेच शासकीय निधीचा गैरवापर किंवा शासनाची फसवणूक झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी विजय प्रल्हाद गवळी यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुक्ताईनगर यांच्याकडे केली आहे. अर्जाची प्रत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही माहितीस्तव देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!