भुसावळात मोठी कारवाई : इनोव्हा कार सह १३.४५ लाखांचा गुटखा जप्त
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज | राज्यात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली. साकेगाव शिवारातील ग्रामीण रुग्णालयाजवळील सर्व्हिस रोडवर पोलिसांनी छापा टाकून ८ लाख ४५ हजार ३०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कार जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण १३ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नूतन परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी साकेगाव परिसरात सापळा रचला.
बऱ्हाणपूरकडून जळगावच्या दिशेने येणारी एमएच १९ एएक्स ३१२५ क्रमांकाची टोयोटा इनोव्हा कार रात्री सुमारे ११.२० वाजता संशयितरीत्या येताना दिसताच पोलिसांनी ती अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आली.
याप्रकरणी कारचालक किशन इंद्रलाल केसवानी (वय ३९, रा. झुलेलाल मंदिराजवळ, सिंधी कॉलनी, पाचोरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने सदर गुटखा बऱ्हाणपूर येथून आणल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, या गुटख्याचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि या अवैध वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास भुसावळ तालुका पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


