भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

मोठं संकट! नेपाळवर पुन्हा जलप्रलयाचे संकट? 72 तासांत बॅरिअर लेक फुटण्याची भीती; ओव्हरफ्लो सुरू

मंडे टु मंडे न्यूज | नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नसतानाच आणखी एका संभाव्य संकटाची चिंता निर्माण झाली आहे. चीनच्या सीमेजवळील हिमालयीन भागात असलेल्या एका बॅरिअर लेकमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, पुढील 72 तासांत हा तलाव फुटण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा बॅरिअर लेक चोचेन खोला आणि पुरेपू त्सांगपो नद्यांच्या संगमाजवळील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. वाढत्या जलस्तरामुळे परिस्थितीवर चीनच्या अधिकाऱ्यांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


चीनकडून परिस्थितीवर लक्ष
चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हिमालयाच्या सीमावर्ती भागात या बॅरिअर लेकमुळे निर्माण झालेल्या संभाव्य धोक्याची नोंद करण्यात आली आहे. या भागात हिमनदी तुटण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

चीनच्या जलसंसाधन मंत्रालयाने संबंधित भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, तलावाच्या जलस्तरासह परिसरातील घडामोडींवर सतत नजर ठेवली जात आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तसेच गरज भासल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता यावे, यासाठी यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.


20 लाख क्युबिक मीटर पाणी; ओव्हरफ्लो सुरू
चिनी सरकारी माध्यमांच्या अहवालानुसार, गुरुवारी या बॅरिअर लेकमध्ये सुमारे 20 लाख क्युबिक मीटर पाणी असल्याचे आढळून आले. तलावातील पाणी ओव्हरफ्लो होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.सध्याच्या हवामानाचा अंदाज पाहता पुढील तीन दिवसांत तलावात आणखी सुमारे 30 लाख क्युबिक मीटर पाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावाची नैसर्गिक अडथळा-भिंत कमकुवत होऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.यामुळे सीमावर्ती भागांसह नेपाळमधील नदीकाठच्या परिसरात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

तिबेटमध्ये 558 जण बेपत्ता
दरम्यान, नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात यापूर्वी झालेल्या भीषण भूस्खलन आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिबेटमध्ये किमान 558 जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळच्या सीमावर्ती भागात किमान 100 चिनी नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.

अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक घरे, रस्ते आणि वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आहे.बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

युद्धपातळीवर मदतकार्य
संभाव्य धोका लक्षात घेऊन संवेदनशील भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. चीनने बचाव आणि मदतकार्यासाठी बीजिंग आणि चेंगदू येथून विशेष अग्निशमन व बचाव पथके रवाना केली आहेत.
स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. काही भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असला तरी नदीकाठच्या आणि बंदर परिसरातील काही भाग अद्याप अंधारात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बॅरिअर लेकच्या जलस्तरावर चीनच्या अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष असून, पुढील 72 तासांत परिस्थिती कशी बदलते याकडे संपूर्ण यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!