भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

धार्मिकमहाराष्ट्रसामाजिक

रक्षाबंधन…बहिण-भावाच्या अतुट आणि पवित्र नात्याचा सण…रंजक पौराणिक कथा…..शुभ वेळ….संभ्रम… सविस्तर वाचा…..

मंडे टु मंडे न्युज | हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वैदिक पंचांगानुसार, या वर्षी रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि नात्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी तसेच समृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्यामुळे, यंदा 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 9.47 पर्यंतच आहे.

रक्षाबंधन 2026 ची अचूक तिथी आणि वेळ
पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:47 वाजेपर्यंत राहणार आहे. यावर्षी, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील रक्षाबंधनाच्या दिवशीच होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सूतक काळ वैध राहणार नाही आणि रक्षाबंधनाच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र याच दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी 9.47 पर्यंतच आहे. तर मग राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती? जाणून घ्या..

राखी बांधण्याची ‘ही’ खरी शुभ वेळ!
महाराष्ट्रातील पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याची शुभ वेळ महत्त्वाची मानली जाते. पंचांगानुसार, यंदा पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:47 वाजेपर्यंत राहणार आहे. पंचांगकर्त्यांच्या माहितीनुसार, 28 ऑगस्टचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनाचा असणार आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथी जरी समाप्त झाली असेल, तरी तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकता..

रक्षाबंधनला होणाऱ्या चंद्रग्रहण, सूतक काळ वैध असेल का?
ज्योतिषींच्या मते, 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रग्रहण सकाळी 8:04 वाजता सुरू होईल आणि सकाळी 11:21 वाजता संपेल. हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतक काळ पाळला जाणार नाही, कारण हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार, सुतक काळ केवळ त्या ग्रहणांसाठीच लागू असतो, जी आपल्या परिसरातून दिसतात. त्यामुळे रक्षाबंधनच्या सणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

रक्षा बंधन हा बहीण-भावाच्या पवित्र आणि अतूट प्रेमाचा सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. ‘रक्षा बंधन’ म्हणजे रक्षणाचे धागा किंवा वचन.

रक्षाबंधन साजरे करण्याची सुरुवात कलियुगात नव्हे, तर पौराणिक काळापासूनच झाली होती. अशी मान्यता आहे की सर्वप्रथम सत्ययुगापासून राखीपौर्णिमेची सुरुवात झाली आणि माता लक्ष्मीने राजा बलीला रक्षासूत्र बांधून या परंपरेचा शुभारंभ केला. रक्षाबंधनाच्या इतिहासाबाबत अशाच काही इतर कथाही प्रचलित आहेत.

पौराणिक कथे नुसार …
इंद्र आणि इंद्राणी
भविष्य पुराणातील एका कथेत सांगितले आहे की, इंद्रदेवांची पत्नी शुची यांनी त्यांना राखी बांधली होती. एकदा देवराज इंद्र आणि दानवांमध्ये भीषण युद्ध झाले. जेव्हा दैत्यांचा पराभव होऊ लागला, तेव्हा देवराजांची पत्नी शुची यांनी गुरु बृहस्पतींच्या सांगण्यावरून देवराज इंद्रांच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले. त्यानंतर इंद्रांनी या रक्षासूत्राच्या शक्तीने स्वतःचे आणि आपल्या सैन्याचे प्राण वाचवले.

रक्षाबंधन आणि संतोषी मातेचा जन्म
असे म्हटले जाते की, एकदा रक्षाबंधनाच्या सणाला गणपती आपल्या बहिणीसोबत हा सण साजरा करत होते. त्यावेळी त्यांचे पुत्र शुभ आणि लाभ यांनीही हा सण साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्री गणरायाने सुरुवातीला नकार दिला, परंतु त्यांची बहीण, पत्नी रिद्धी आणि सिद्धी तसेच पुत्र शुभ आणि लाभ यांच्या वारंवार आग्रहामुळे त्यांनी एका कन्येला प्रकट केले. या कन्येचे नाव संतोषी ठेवण्यात आले आणि अशा प्रकारे माता संतोषीचा जन्म झाला.

माता लक्ष्मी आणि राजा बली
राजा बली यांचे दानधर्माचे कार्य इतिहासात प्रसिद्ध आहे. एकदा माता लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधून त्या बदल्यात त्यांच्याकडे भगवान विष्णूंना मागितले होते. कथा अशी आहे की, एकदा राजा बलीने यज्ञाचे आयोजन केले. तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले आणि दानशूर राजा बलीकडे तीन पावले भूमी मागितली. बलीने होकार दिला, तेव्हा वामन अवताराने केवळ दोन पावलांत संपूर्ण पृथ्वी आणि आकाश व्यापून घेतले. राजा बलीला समजले की श्रीहरी त्याची परीक्षा घेत आहेत. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी राजा बलीने भगवंतासमोर आपले मस्तक पुढे केले. त्यानंतर त्यांनी भगवान विष्णुंकडे विनंती केली की, आता तर माझे सर्वस्व गेले आहे, प्रभू, माझी विनंती स्वीकारा आणि माझ्यासोबत पाताळात येऊन राहा. श्रीहरींना भक्ताची विनंती मान्य करावी लागली आणि विष्णूजी वैकुंठ सोडून पाताळात गेले. जेव्हा माता लक्ष्मीला हे कळलं, तेव्हा त्या गरीब स्त्रीचे रूप धारण करून बलीकडे गेल्या आणि राजा बलीला राखी बांधली. बली म्हणाले की, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी तर काहीही नाही. यावर देवी लक्ष्मी आपल्या मूळ रूपात आल्या आणि म्हणाल्या की, तुमच्याकडे तर साक्षात श्रीहरी आहेत आणि मला तेच हवे आहेत. यावर बलीने भगवान विष्णूंना माता लक्ष्मीसोबत जाण्याची विनंती केली. तेव्हा जाताना भगवान विष्णूंनी राजा बलीला वरदान दिले की, ते दरवर्षी चार महिने पाताळातच निवास करतील आणि ते चार महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात.

द्रौपदी आणि श्रीकृष्ण
जेव्हा युधिष्ठिर इंद्रप्रस्थ येथे राजसूय यज्ञ करत होते, त्यावेळी सभेत शिशुपालही उपस्थित होता. शिशुपालाने श्रीकृष्णाचा अपमान केला, तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. परत येताना सुदर्शन चक्रामुळे कृष्णजींच्या करंगळीला दुखापत झाली आणि रक्त वाहू लागले. तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णांच्या करंगळीवर बांधला. तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले की, ते सदैव द्रौपदीचे रक्षण करतील. म्हणूनच कौरवांनी जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण केले, तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज राखली. अशी मान्यता आहे की, ज्या दिवशी द्रौपदीने श्रीकृष्णांच्या करंगळीवर साडीच्या पदराचे वस्त्र बांधले होते, तो श्रावण पौर्णिमेचा दिवस होता.

राजा हुमायूं आणि राणी कर्णावती
मध्ययुगीन भारतात रक्षाबंधन असे म्हणताच राजा हुमायूं आणि कर्णावतीची लोककथा सांगितली जाते. त्या काळात एकमेकांचे राज्य बळकावण्यासाठी सर्वत्र हाणामारी सुरू होती. मेवाडच्या महाराजांच्या विधवा राणी कर्णावती राजगादीवर विराजमान होत्या. गुजरातचा सुलतान बहादूर शाह त्यांच्या राज्यावर नजर ठेवून होता. तेव्हा राणीने हुमायूंला भाऊ मानून राखी पाठवली. हुमायूंने राणीच्या पाठवलेल्या राखीचा स्वीकार केला. दोघांचा धर्म वेगवेगळा होता पण राजा हुमायूंला रक्षासुत्राचे महत्त्व माहित होते. त्याने बहादूर शाहपासून राणी कर्णावतीच्या राज्याचे रक्षण केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!